अमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता

अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.

Updated: Mar 30, 2012, 11:57 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे  इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा  गंभीर इशारा  दिला आहे.  दरम्यान, आंतरराष्ट्रीय बंधनांच्या चौकटीत राहून अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या इराणच्या अधिकारांवर ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले.

 

 

नवी दिल्लीत गुरूवारी ब्रिक्स परिषद झाली. य़ावेळी हा गंभीर इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, चीनचे अध्यक्ष हूजिंताव, रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव, ब्राझीलच्या अध्यक्ष दिलमा रूसेफ आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त निवेदनात इराणमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत  सीरियातील स्थितीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. इराणमधील स्थितीवर चर्चा करून आणि राजनैतिक पातळीवर प्रयत्न करून तोडगा काढावा, असेही ‘ब्रिक्स’ देशांनी म्हटले आहे.  ब्रिक्स देशांनी घेतलेली ही भूमिका म्हणजे अमेरिकेच्या युद्धखोर धोरणांना दिलेली चपराकच मानली जात आहे.

 
ब्रिक्स परिषदेत सीरियात सुरू असलेला सर्व प्रकारचा हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन त्वरित थांबवावे आणि तेथे राजकीय प्रक्रियेद्वारे तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. इराणमधील स्थिती अधिक चिघळू देऊ नये, तसे झाल्यास भीषण परिणामांना तोंड द्यावे लागेल आणि ते कोणाच्याही हिताचे ठरणार नाही, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तर शिखर परिषदेनंतर ब्रिक्स नेत्यांनी पश्चिम आशियातील स्थितीबाबत चर्चा केली आणि त्यावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे मान्य केले.

 
आता ‘ब्रिक्स बँके’ची स्थापना 

ब्रिक्स देशांतील व्यापार स्थानिक चलनाद्वारे करण्याच्या आणि जागतिक बँकेच्या धर्तीवर वित्तीय सहकार्यासाठी विकास बँक स्थापण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबतच्या दोन करारांवर  ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी सह्य़ा केल्या.  ब्रिक्स देशांच्या विकास बँकांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्याने स्थानिक चलनात पतपुरवठा होऊन व्यापाराला चालना मिळेल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.

 

 

 

ब्रिक्समध्ये कोण आहे?

भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे देश ब्रिक्स मध्ये आहेत.