उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काय टाळलं !

ब-याच दिवसानंतर दिल्ली दौ-यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच. शिवाय असोचेम इंडिया या उद्योजकांच्या संमेलनात चक्क हिंदीमधून भाषण करून राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. यापुढे `मुंबई-दिल्ली कॉरीडोर`चा वापर करू असं सांगत त्यांनी पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मात्र, त्यांची एक गोष्ट आवर्जुन टाळली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 22, 2013, 09:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,दिल्ली
ब-याच दिवसानंतर दिल्ली दौ-यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच. शिवाय असोचेम इंडिया या उद्योजकांच्या संमेलनात चक्क हिंदीमधून भाषण करून राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. यापुढे `मुंबई-दिल्ली कॉरीडोर`चा वापर करू असं सांगत त्यांनी पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मात्र, त्यांची एक गोष्ट आवर्जुन टाळली.
उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील उद्योगपतींसमोर हिंदीतून भाषण करून चांगली छाप पाडलीच, पण त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे देखील मागे राहिले नाहीत. या संमेलनात मध्येच उठून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही बोलले... युवकांच्या प्रश्नांवर पंतप्रधानांना सल्ला देण्यासाठी युथ कौन्सिल हवं, अशी मागणी करून ज्युनिअर ठाकरेंनी आपली चमक दाखवली. युवकांचे प्रश्न हिरीरीनं मांडणारे आदित्य ठाकरे बोल्ड आणि बिनधास्त असल्याचा प्रत्ययच यानिमित्तानं आला.
दिल्ली दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. तत्पुर्वी युवकांशी झालेल्या वार्तालापामध्ये नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी थेट घेण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं. त्यांच्या आधीच्या भाषणाचा धागा पकडून मोदी तुम्हाला भरवशाचा चेहरा वाटत नाही का, असा प्रश्न एका तरुणानं केला. त्यावर खूप चेहरे आहेत, राजनाथ सिंग आणि मी बसून नंतर निर्णय घेऊ, इतकंच ते म्हणाले.

देशातून उद्योग का बाहेर जात आहेत, हे थांबवणं सरकारची जबाबदारी नाही का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. असोचेमनं दिल्लीत आयोजित केलेल्या `द व्हिजन ऑफ न्यू व्हायब्रंट इंडिया` या परिषदेत ते बोलत होते. येणारं सरकार हे आपलंच असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.