तहानलेल्या मोहम्मद अझरुद्दीनचा रेल्वेत मृत्यू

उत्तरप्रदेशमधील वेटलिफ्टर मोहम्मद अझरुद्दीन या खेळा़डूला रेल्वे प्रवासात पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 9, 2014, 03:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशमधील वेटलिफ्टर मोहम्मद अझरुद्दीन या खेळा़डूला रेल्वे प्रवासात पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तहानलेल्या अझरुद्दीनला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अन्य रेल्वे प्रवाशांनी केला असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल अशी सावध प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
वेटलिफ्टींगमध्ये चमकदार कामगिरी करणारा उत्तरप्रदेशमधील खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन हा हरियाणातील अंबाला येथील एका स्पर्धेसाठी गेला होता. या स्पर्धेत त्याने रौप्यपदकही पटकावले होते. यानंतर अझरुद्दीन रविवारी जम्मू टाटानगर मुरी एक्स्प्रेसने घरी परतत होता. मुरी एक्सप्रेसच्या एस - ७ कोचमधून प्रवास करणा-या अझरुद्दीनला तहान लागली होती. मात्र एक्सप्रेसच्या एकाही कोचमध्ये पाणी उपलब्ध नव्हते. यानंतर अझरुद्दीनची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. अलाहाबाद ते मिर्झापूर या स्थानकादरम्यानच्या प्रवासात त्याचा मृत्यू झाला.
अझरुद्दीनच्या मृत्यूनंतर अन्य रेल्वे प्रवाशांनी एक्सप्रेसमधील टीसीवर राग काढला. प्रवाशांनी टीसीलाच चोप दिला. मिर्झापूर स्थानकावर गाडी थांबल्यावर प्रवासांनी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी सकाळपासून गाडीत पाणी उपलब्ध नव्हते. अलाहाबाद स्थानकावर आम्ही पाण्याची टाकी भरण्याची विनंती रेल्वे कर्मचा-यांना केली होती. पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही असे या प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी वेटलिफ्टर मोहम्मद अझरुद्दीनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.