`सैनिक मरतात, नेत्यांना मात्र चाड नाही`

‘केवळ लज्जास्पद! सीमेवर आपले सैनिक मरत आहेत पण ढिम्म नेत्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. जे देशाच्या शहिदांचा सन्मान करू शकत नाहीत ते कधीही पुढे जाऊ शकत नाहीत’

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 10, 2013, 12:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भिवानी
‘केवळ लज्जास्पद! सीमेवर आपले सैनिक मरत आहेत पण ढिम्म नेत्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. जे देशाच्या शहिदांचा सन्मान करू शकत नाहीत ते कधीही पुढे जाऊ शकत नाहीत’ असं म्हटलंय माजी सेनाध्यक्ष जनरल व्ही. के. सिंह यांनी.
हरियाणाच्या भिवानी इथं शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिंह बोलत होते. यावेळी शहिदांच्या अंत्यसंस्काराला एकाही नेत्याची उपस्थिती नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाच सैनिकांची क्रूर हत्या झाल्यानंतर सिंह यांनी ‘सेनेच्या कामात सरकारनं लुडबूड न करता त्यांना काम करू द्यावं... सेना सीमेवर चांगलं काम करत आहे’ असं म्हटलंय.
पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानं कारवाई करावी का? या प्रश्नाला उत्तर देताना सिंह म्हणतात, ‘भारताकडून पाकिस्तानला वाचण्यासाठी कोणताही मार्ग दिला जाऊ नये’... यानंतर त्यांना विचारण्यात पाकिस्तान आणि चीननं भारतातील घुसखोरीबद्दल विचारलं गेलं तर त्यांचं उत्तर होतं... ‘जर सरकारच आपली जमीन त्यांच्या ताब्यात देत असतील तर इतर कोणी काय करू शकतं?’

दरम्यान, पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मुजोर पाक सैन्यानं पुन्हा एकदा पूँछच्या खरी करमा परिसरात गोळीबार केला. या आठवड्यातील दुसऱ्यांदा हल्ला पाक सैन्याकडून करण्यात आलाय. करमा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री २.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी भारतीय सैन्यानं पाकला चोख प्रत्युत्तर दिलं. गोळीबार करत सीमेत घुसखोरी करण्याचा पाकचा डाव भारतीय जवानांनी हाणून पाडलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.