वेदप्रताप वैदिक यांची हाफीज सईद भेटीवरून गदारोळ

रामदेव बाबांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक यांनी पाकिस्तानात वाँटेड दहशतवादी हाफीज सईदची भेट घेतली. एक पत्रकार म्हणून ही भेट घेतली असून हा फोटो स्वतः रिलीज केल्याचं खुद्द वैदीक यांनी स्पष्ट केलंय. 

Updated: Jul 14, 2014, 12:12 PM IST
वेदप्रताप वैदिक यांची हाफीज सईद भेटीवरून गदारोळ title=

नवी दिल्ली: रामदेव बाबांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक यांनी पाकिस्तानात वाँटेड दहशतवादी हाफीज सईदची भेट घेतली. एक पत्रकार म्हणून ही भेट घेतली असून हा फोटो स्वतः रिलीज केल्याचं खुद्द वैदीक यांनी स्पष्ट केलंय. 

मात्र त्यांच्या या सईद भेटीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. आज याच मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आलं. या भेटीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मायावती यांनी केलीय. दरम्यान या भेटीची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीये. 

कशी झाली भेट?

पाकिस्तानमध्ये जाऊन हाफीज सईदची भेट घेणारे वरिष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी भारतात परतल्यावर हाफीजशी झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वैदिक म्हणाले, हाफीज सईदनं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. तसंच त्याचा मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यालाही विरोध नाही. लाहोरमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हाफीज राहत असून त्याचं घर वर्दळीच्या ठिकाणीच आहे, असं वैदिक सांगतात. 

हाफीजनं वैदिक यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मुंबईत फिरण्याची इच्छाही व्यक्त केली. माझे आई-वडील पाकिस्तानमध्ये येण्यापूर्वी पंजाबमध्ये राहायचे अशी आठवण त्यानं सांगितल्याचं वैदिक यांनी नमूद केलं. भारतात आल्यावर मला माझी बाजू आणखी योग्य रितीनं मांडता येईल असंही हाफीज स्पष्ट केलंय.

वैदिक हे योगगुरु रामदेव बाबा यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. वैदिक यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हाफीज सईदची भेट घेतल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पाक दौऱ्यावर मी पत्रकार या नात्यानं गेलो होतो. पाकला जाताना हाफीज सईदशी मुलाखत होईल याची सूतराम कल्पना नव्हती. तिथं स्थानिक पत्रकारानं ही भेट घडवून आणल्याचा दावा वैदिक यांनी केला आहे. या दौऱ्यात वैदिक हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अन्य नेत्यांचीही भेट घेतली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.