विजय पांढरेंची राजकीय इनिंग सुरू

जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांनी निवृत्त झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. राजकारणाच्या आखाड्यात उतरणाऱ्या पांढरे यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास पांढरे उत्सुक आहेत.

Aparna Deshpande | Updated: Dec 1, 2013, 09:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांनी निवृत्त झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. राजकारणाच्या आखाड्यात उतरणाऱ्या पांढरे यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास पांढरे उत्सुक आहेत.

सिंचन घोटाळा उघडकीस आणलेले महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता विजय पांढरे पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या सेकण्ड इनिंगमुळे. जेमतेम २४ तासात पांढरे यांची दोन वेगळी रूपं नाशिककरांना बघायला मिळाली.
शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मेरी संस्थेत शासकीय सेवेतील जुन्या सहकारीकडून निरोप आणि शुभेच्छाचा स्वीकार करणारे पांढरे निवृतीनंतर सरकारी बंधांतून मुक्त झाले आणि बरोब्बर २४ तासांनी म्हणजेच राविवारी दुपारी एकच्या सुमारास पांढरे आम आदमी पार्टीतील नवीन सहकाऱ्यांकडून स्वागत आणि शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसले.
पार्टीतील अधिकृत प्रवेशानंतर आता ते अंजनी दमानिया यांच्या बरोबर राज्याचा दौरा करणार आहेत. पक्षीय संघटन मजबुती बरोबरच पांढरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असून नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याची माहिती पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीवर शंका उपस्थित करून याबाबत सीबीआय चौकशीची मागणी पांढरे यांनी केली होती. आम आदमी पार्टी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या संपर्कात होती अशी माहिती दमानिया यांनी दिलीये.
अण्णा हजारेंची भेट घेणार का? सिंचन घोटाळयातील खऱ्या सूत्रधारांची नावं उघड करणार का? सिंचन घोटाळ्यातील महत्वाचे मुद्दे उजेडात आणणार का? अशा प्रश्नांवर सध्या तरी पांढरेंनी भाष्य करणं टाळलं असलं तरी ‘आप’च्या मंचावरून पांढरे कोणत्या भ्रष्ट नेत्यांचं पितळ उघडं पाडणार याची उत्सुकता सर्वांना लागलीये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.