कोण होणार मुख्यमंत्री? राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला

आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.

Updated: Sep 18, 2014, 04:52 PM IST
कोण होणार मुख्यमंत्री? राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.

एकीकडे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचं सातत्य राखण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे या निवडणुकीतल्या अपयशाचा शिक्का पुसण्यासाठी धडपडत आहेत. दोन्ही भाऊ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागलेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत यावेळी राज आणि उद्धव प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

कृष्णकुंज आणि मातोश्रीवर खलबतं, सुरू आहेत. शिवसेना भवन आणि राजगडावर बैठकांचा धडका सुरु आहे. यावरून ठाकरे बंधू कामाला लागले आहेत, हे स्पष्ट होत आहे. तर विधानसभा निवडणुकीची ब्ल्यू प्रिंट तयार होत आहे. तर उद्धव विकासाचा मुद्दा मांडण्यावर भर देत आहेत.

राज आणि उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणूकीतही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण यावेळचा संघर्ष थोडा वेगळा असेल. मनसेच्या महाराष्ट्र विकासाच्या ब्ल्यू प्रिंटला आव्हान असेल शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याचं... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची मुंबई व्हिजन लोकांसमोर आणून स्पर्धेत आघाडी घेतलीय.

नेते पदाधिका-यांशी चर्चा करुन धोरणं ठरवली जात आहेत. पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत उद्धव यांनी दिलेत. शिवसैनिकांमधला उत्साह टिकून राहावा यासाठी उद्धव यांनी भरगच्च कार्यक्रमांची आणखी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या भ्रमात राहू नका असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपकडून दबावाचं राजकारण वाढत गेल्यास प्रसंगी 288 जागा लढवण्याची तयारीही शिवसेनेकडून सुरु असल्याचं नेते खासगीत सांगत आहेत.

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यात राज ठाकरेंनीही मुख्यमंत्री बनण्याचं सूतोवाच केल्यानं उद्धव ठाकरेंपुढं आव्हान उभं राहिलंय. राज ठाकरे आणि आव्हान हे तसं जुनंच समीकरण आहे. परंतु विधानसभा निवडणुकीनं एक वेगळं आणि मोठं आव्हान मनसे अध्यक्षांसमोर असणार आहे. स्वतः साठी सुरक्षित मतदारसंघ शोधणं आणि पक्षाला घवघवीत यश मिळवून देणं असा दुहेरी पेच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी राज ठाकरेंना बरंच काही शिकवलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल केलेत. निवडणुकीसाठी ते प्रचंड मेहनत घेताना दिसताहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राच्या मतदारांपुढे येणार असल्याची माहिती मिळत आहे. तेही आपल्या सहका-यांसमवेत निवडणूकीची रणनिती आखत आहेत.

मनसेच्या 11ही आमदारांना निवडणूक लढवण्याची पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच मनसेचे जिल्हा संपर्क नेते आणि सरचिटणीस महाराष्ट्राच्या विविध भागात जाणार आहेत. नेत्यांकडून माहिती घेतल्यावर जुलैच्या मध्यावर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा अपेक्षित मानला जातोय. मुख्यमंत्री पदासाठी राज ठाकरे यांनी दावा केल्यानं दोनशेहून अधिक जागा लढवण्याची तयारी मनसेकडून सुरु आहे. दोघा ठाकरे बंधूंच्या या साठमारीत कुणाची सरशी होते, कुणाची व्यूहरचना यशस्वी ठरते, याकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी आक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.