`एनडीए`ची भारत बंदची घोषणा..., bharat band on 20 september

`एनडीए`ची भारत बंदची घोषणा...

`एनडीए`ची भारत बंदची घोषणा...
www.24taas.com, नवी दिल्ली
डिझेलची दरवाढ आणि ‘एफडीआय’च्याविरोधात एनडीएनं २० सप्टेंबरला भारत बंद पुकारलाय. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी याविषयीची घोषणा केली. तसचं पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सरकारनं संसदेत दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोपही अडवाणी यांनी केलाय. तर याच दिवशी डावे पक्ष, समाजवादी पार्टी, बीजेडी, टीडीपी, जेडीएस हे पक्षही देशव्यापी निदर्शन करून त्यांचा रोष व्यक्त करणार आहेत. त्यामुळे २० सप्टेंबरला देशभरात बंद आणि आंदोलनाच्या माध्यातून सरकारच्या विरोधात हल्लाबोल असं चित्र राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. सरकारला बाहेरून पाठींबा देणाऱ्या पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं सरकारसमोरील अडचणींमध्ये भर पडलीय.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी कठोर भाषेत सरकारवर टीकास्त्र सोडत, येत्या दोन दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. सरकार पाडण्याची इच्छा नाही मात्र प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘डिझेलची दरवाढ मागे घ्या’ या मागणीसह एफडीआयला ठाम विरोध असल्याचं ममतांनी ठणकावून सांगितलं. ममतांपाठोपाठ द्रमुकनंही या निर्णयांना विरोध दर्शवत, आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय. तर यूपीए सरकारला बाहेरुन पाठिंबा देणाऱ्या सपा आणि बसपानंही एफडीआयच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. या सगळ्यांचं लोकसभेतील पक्षीय बलाबल मोठ्या संख्येनं असल्यानं एफडीआयच्या निर्णयावर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, September 15, 2012, 19:38


comments powered by Disqus