‘महागाई हाय... हाय...’

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, September 14, 2012 - 13:52

www.24taas.com
महाराष्ट्रातही महागाईच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. सरकारनं सामान्यांवर लादलेल्या दरवाढीचा विविध स्तरांतून निषेध होतोय.
महागाईची होरपळ
केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीच्या भाड्यातही दरवाढ होण्याचे संकेत मिळालेत. डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ आता स्कूलबसची भाडेवाढही होणार आहे. स्कूलबसचं भाडं ३० ते ३५ रूपयांनी वाढणार आहे. महागाईचे पडसाद भाजीपाल्यावरही उमटू लागलेत. बॉम्बे गुड्स असोसिएननं माल वाहतूक दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यामुळे मुंबईकरांचा भाजीपाला महागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे दिल्लीत ऑल इंडिया मोटर काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत माल वाहतूक भाड्यात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
ठाणे : उपमुख्यमंत्र्यांची गाडी रोखली
ठाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अडवली. महागाईविरोधात संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांची गाडी अडवली. विशेष म्हणजे घोडागाडीवरून हे कार्यकर्ते आले होते. सोबत सिलेंडर आणून त्यांनी केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध केला. राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांचा मेळावा हॉटेल सत्कार रेसिडन्सी इथं आहे. त्याकरता अजितदादा ठाण्यात आलेत. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी हा निषेध नोंदवण्यात आल्याचं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

दादर : घोषणाबाजी आणि निषेध
महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीनं आज शिवसेना भवनासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. शिवसेना नेते मनोहर जोशी हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
खार रोड, मुंबई : चपात्या लाटून सरकारचा निषेध
डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राज्यातले विरोधी पक्ष रस्त्यावर आले आहेत. शिवसेनेच्यावतीनं मुंबईत खारमध्ये आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी सिलिंडर आणि घोडागाडीतून येऊन आंदोलन केले. तर महिला शिवसैनिकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पोळपाट, लाटणे घेऊन रस्त्यावरच चपात्या लाटून सरकारचा निषेध करण्यात आला.

नागपूर : घातल्या भाज्यांच्या माळा
नागपुरातही दरवाढीचे पडसाद उमटले. शिवसेनेनं शहरातील पंचशील चौकात लाटणं मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एव्हढच नाहीतर, नागरिकांनी गळ्यात कांदे, बटाटे आणि इतर भाज्यांच्या माळा घालत सरकारचा निषेध केला. सरकारने केलेली ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पुणे : ‘दरवाढ मागं घ्या’
डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय. पुण्यात भाजपनं आंदोलन छेडलं. आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने लादलेली ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी भाजपने केलीये. तर दुसरीकडे मनसेनही दरवाढीविरोधात आंदोलन छेडलं. मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केलाय. सरकारने लादलेली ही दरवाढ सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी आहे, त्यामुळे सरकारनं त्वरित ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी मनसेनं केलीये.

First Published: Friday, September 14, 2012 - 13:34
comments powered by Disqus