सईदवर अमेरिकेचे ५१ कोटींचे इनाम

Last Updated: Tuesday, April 3, 2012 - 14:34

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अमेरिकन सरकारने हाफिझ सईदला पकडण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे. हाफिझ सईद मुंबईवर झालेल्या 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे भारताच्या दहशवादाविरुध्दच्या लढ्याला आणि सईद दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचा दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.

 

हाफिझ सईद हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा प्रमुख देखील आहे. ओबामांच्या सरकारने या संबंधी घोषणा केल्याचं भारताच्या भेटीवर असेलेले अमेकिचे अंडर सेक्रेटरी वेंडी शेरमन यांनी भारत सरकारला माहिती दिली. दहशतवादी कारवायांमध्ये आकंठ बुडालेल्या लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावा या दोन्ही संघटनांना अमेरिकन सरकारने काळ्या यादीत टाकलं होतंच. भारत भेटीवर आलेल्या शेरमन यांनी सईद यांच्या व्यतिरिक्त त्यांचे मेहुणे आणि लष्करचे सहसंस्थापक अब्दुल रहमान मक्की यांना पकडण्यासाठीही तीन दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे.

 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदाचा प्रचंड दबाव असताना सईद आणि त्याचे साथीदार पाकिस्तानात मोकाट फिरत होते. पाकिस्तान सरकारने सईद आणि त्याच्या साथीदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला वेळोवेळी सबळ पुरावे देऊन देखील पाकिस्तानने त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष्य केलं. पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत सईदने अनेक वेळा पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबादमध्ये अनेक सभा घेतल्या. आता अमेरिकन सरकारने तालिबान प्रमुख मुल्लाह ओमरला पकडण्यासाठी जेवढं इनाम जाहीर केलं होतं तेव्हढचं सईदला पकडण्यासाठीही देऊ केलं आहे यावरुन प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात यावं.

 First Published: Tuesday, April 3, 2012 - 14:34


comments powered by Disqus