चीन ‘हायस्पीड’... सर्वात मोठा बुलेट ट्रेन मार्ग खुला

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, December 27, 2012 - 15:01

www.24taas.com, बीजिंग
चीनमध्ये सर्वाधिक दूरवर जाणारा हायस्पीड म्हणजेच बुलेट ट्रेनचा मार्ग खुला झालाय. चीनची राजधानी बिजींग आणि ग्वांगजो या दोन शहरांना जोडणारा हा मार्ग आहे.
चीनमधल्या दोन महत्त्वाच्या शहरामधलं अंतर २ हजार २९८ किलोमीटर इतकं आहे. पूर्वी हे अंतर पार करायला तब्बल २० तास खर्ची व्हायचे. पण, आता मात्र हे अंतर केवळ ८ तासांत पार करता येईल. प्रति तास ३०० किलोमीटर वेगानं धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे हे शक्य होऊ शकलंय. दररोज या ट्रेनच्या १५५ जोड्या या मार्गावरून धावणार आहेत. चीनने गेल्याय काही वर्षांमध्येव बुलेट ट्रेन्‍सचे जाळे झपाट्याने वाढविले आहे. बुधवारी जगातील सर्वात लांब पल्याच्या बुलेट ट्रेनचा प्रारंभ करून चीननं एक इतिहासच घडवलाय. जर्मनीच्या सिमेन्ससारख्या जगविख्यात कंपन्याच्या सहकार्याने चीनने हा महत्वाकांक्षी प्रकल्प तडीस नेला आहे.
भारतात मात्र, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे या मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याची बाब अद्याप चर्चा आणि किरकोळ सर्वेक्षणांच्या पुढे गेलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनशी स्पर्धा करताना पायाभूत सुविधाही त्याच देशाच्या तोडीच्या करण्यासाठी आपण प्रयत्न कधी करणार, हा प्रश्न अनेकांना सतावतोय.

First Published: Thursday, December 27, 2012 - 11:29
comments powered by Disqus