गाय व्हीटल मगरीसोबत झोपतो तेव्हा...

अक्राळ विक्राळ मगर पलंगाखाली झोपली असताना झिम्बॉब्वेचा माजी क्रिकेट कॅप्टन गाय व्हीटल शांत झोपला होता... आणि ही त्यानं पाळलेली मगर मात्र निश्चितच नव्हती...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 19, 2013, 02:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हरारे
अक्राळ विक्राळ मगर पलंगाखाली झोपली असताना झिम्बॉब्वेचा माजी क्रिकेट कॅप्टन गाय व्हीटल शांत झोपला होता... आणि ही त्यानं पाळलेली मगर मात्र निश्चितच नव्हती... हे सांगितलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण, हे खरंच घडलंय.
झालं असं की, रात्रीचं जेवण झाल्यानंतर व्हीटल आपल्या रुममध्ये परतला. तेव्हा त्या खोलीत कुणीही नव्हतं. पण, त्याला झोप लागल्यानंतर रात्री कधीतरी जवळजवळ आठ फूट लांबीची एक मगर त्याच्या खोलीत शिरली आणि तीनं झोपण्यासाठी व्हीटलच्या पलंगाखाली जागा पकडली.
सकाळी डोळे चोळत चोळत उठणारा व्हीटल पलंगाखाली पाय ठेवणार एवढ्यात त्याच्या नोकरानं दरवाजातूनच मगरीला पाहिलं आणि तो जोरात किंचाळला. व्हीटलही दचकला आणि त्यानं एकदम आपला पाय वर घेतला. खाली बघितलं तेव्हा त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याची झोप एका झटक्यात उडाली होती. रात्रभर तो एका मगरीच्या वर शांतपणे झोपला होता. मगर आणि व्हीटल यांच्यामध्ये केवळ आठ इंचांचं अंतर उरलं होतं.

रात्री झोपेत व्हीटलचा चुकून जरी पाय या मगरीला लागला असता तर त्याला आपल्या प्राणाला मुकावं लागलं असतं. पण अनर्थ टळला. मग थोड्या वेळानं त्यानं स्वत:ला सावरून मगर पकडणाऱ्यांना बोलावून घेतलं आणि मगच सुटकेचा श्वास सोडला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.