परदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल

  परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.

Updated: Jun 27, 2014, 04:53 PM IST
परदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल title=

 

मेलबर्न :  परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड राज्यातील इस्पविच शहरात ‘इंडियन महफील’ नावाच्या हॉटेलचे मालक राज शर्मा आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही घटना घडलीय. राज शर्मा आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत ऑस्ट्रेलियातील हॉटेलजवळ उभे असताना दोन तरुणांनी त्यांच्या कुटुंबीयांना वर्णद्वेषात्मक शिवीगाळ केली. इतकंच नाही तर शर्मा यांच्या अंगावर थुंकण्याची या तरुणांची मजल गेली. 

राज शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, तीन जण हॉटेलजवळच असलेल्या सेंट पॉल चर्चनजीकच्या टेकडीवर बसले होते. अचानक, त्यांनी हॉटेलच्या बाहेर बसलेल्या शर्मा कुटुंबीयांवर वंशविरोधी टिपण्णी सुरु केली. त्याच दरम्यान हॉटेलचा कर्मचारी बाहेर गेला असता त्याच्यावरही त्यांनी हल्ला केला. यावेळी रस्ताने जात असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला. मदतीसाठी तो पुढे सरसावला असता या तिघांनी त्याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर मी माझ्या पत्नीला, मुलांना हॉटेलच्या आत घेऊन आलो आणि पोलिसांना बोलवले. मात्र, त्यानंतर त्यांच्यामधला एक व्यक्ती आत आला आणि त्यानं जोर-जोरात शिवीगाळ करण्यास सुरु केली आणि कुटुंबावसमोर अंगावर थुंकून तो तिथून निघून गेला.  

इप्सविच शहराचे सुरक्षित परिषद शहर प्रोगॉम आणि पोलिसांनी या तक्रारीसंबंधी दोन संशयितांची ओळखपरेड केली. यानंतर आरोपींपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याचा या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

क्वीसलॅंडच्या ‘टाई्म्स’ या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षांच्या युवकाला शर्मा यांच्या कुटुंबासोबत गैरवर्तन केल्याबद्दल अटक करण्यात आली. 16 जुलैला त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल. दुसऱ्या आरोपीला न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आलीय.  

इथं भारतीयांवर असे हल्ले घडल्याचा प्रकार आठवड्यातून एकदा तरी घडतोच, असं शर्मा यांनी म्हटलंय. याअगोदर असे हल्ले केवळ चोरीछुप्या पद्धतीनं रात्रीच्या अंधारात होत असतं... मात्र, आता हे हल्ले दिवसाढवळ्याही होत असताना दिसतायत, यामुळेच परदेशात राहणारे भारतीय धास्तावलेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.