कानपूर रेल्वे अपघातामागच्या दहशतवाद्याला काठमांडूत अटक

कानपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचा मुख्य सूत्रधार शमशुल होदा यालरा नेपाळची राजधानी काठमांडू इथून अटक करण्यात आलीय.

Updated: Feb 7, 2017, 10:30 AM IST
कानपूर रेल्वे अपघातामागच्या दहशतवाद्याला काठमांडूत अटक

नवी दिल्ली : कानपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचा मुख्य सूत्रधार शमशुल होदा यालरा नेपाळची राजधानी काठमांडू इथून अटक करण्यात आलीय.

आरोपी शमशुल होदा याचा अनेक रेल्वे अपघातांत हात असल्याचं सांगण्यात येतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, होदा हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होता आणि त्यानंच दुबईत बसून भारतातल्या रेल्वेंना आपल्या निशाण्यावर घेतलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी होदा याला डीपोर्ट करण्यासाठी नेपाळ आणि भारतीय चौकशी यंत्रणांनी दबाव टाकल्यानंतर त्याला काठमांडूला आणण्यात आलं. त्याला दुबईवरून नेपाळला डीपोर्ट केल्याचं सांगण्यात येतंय. भारतीय चौकशी यंत्रणा आयबी, रॉ आणि एनआयएच्या टीम्स अगोदरपासूनच नेपाळच्या काठमांडूमध्ये उपस्थित होत्या. होदाची दोन दिवसांपर्यंत चौकशी केल्यानंतर त्याला कलैया नेण्यात आलं. इथं त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरूवात होणार आहे.        

उल्लेखनीय म्हणजे, भारतीय चौकशी यंत्रणांना कानपूर रेल्वे अपघातात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले होते. या अपघातात जवळपास 151 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर अनेक जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी हा अपघात घडवला गेला होता. 

नेपाळहून अटक करण्यात आलेल्या ब्रिज किशोर गिरी याच्या फोनमध्ये एक ऑडिओ क्लिप सापडल्यानंतर या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश झाला होता.