मोदी सरकारला धडा शिकवण्याचा `लष्कर`चा डाव फसला

नुकत्याच, अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याविषयी अफगानिस्तानचे राष्ट्रपती हमिद करझाई यांनी धक्कादायक खुलासा केलाय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 06:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नुकत्याच, अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याविषयी अफगानिस्तानचे राष्ट्रपती हमिद करझाई यांनी धक्कादायक खुलासा केलाय. नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याअगोदर भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून अधिकाऱ्यांना बंधक बनवण्याचा `लष्कर-ए-तोयबा`चा डाव होता पण तो फसला असं करझाई यांनी म्हटलंय.
अफगाण अॅम्बेसेडर शाइदा अब्दाली यांनीही करझाई यांच्या म्हणण्याला दुजोरा दिलाय. लष्कर-ए-तोयबाचं टार्गेट नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होता. अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला करून अधिकाऱ्यांना बंधक बनवून नव्या भारतीय सरकारला धक्का देण्याचा आणि त्यांच्यासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न होता. नव्या सरकारला बॅकफूट आणण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू होती, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप स्वीकारलेली नाही. पण, अफगान पंतप्रधान करझाई यांनी या हल्ल्यामागे हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेचाच हात असल्याचं म्हटलंय. पश्चिमी गुप्तचर संघटनांकडून आपल्याला ही माहिती मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पण या गुप्तचर संघटनेचं नाव जाहीर करण्यास मात्र त्यांनी नकार दिलाय. हल्लेखोर अफगानी होते की पाकिस्तानी याचा मात्र अद्याप खुलासा झालेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.