पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

Updated: Dec 30, 2015, 11:22 AM IST
पत्नीची क्रूर हत्या...  रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा! title=

रायगड : मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

मुंबईतील माटुंग्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मिनी धनंजयशी अतिफचं सूत जुळलं होतं. २००८ मध्ये त्यांनी विवाह केला त्यानंतर मिनीनं आपलं नाव बदलून बुशरा ठेवलं.

लग्नानंतर अतिफ पत्नीसह नोकरीनिमित्तानं दुबईला गेला. मात्र २०१३ मध्ये अचानक बुशरा गायब झाली... आणि अल फक्वा भागात तिचा मृतदेह सापडला. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती.

हत्येनंतर अतिफ एका मित्राच्या मदतीनं दुबईहून भारतात पळाला. मात्र जून २०१३ मध्ये तो पुन्हा यूएईतील पोलिसांना स्वत: शरण आला. स्थानिक न्यायालयाने त्याला देहदंडाची शिक्षा सुनावलीय. दुबईत फायरिंग स्कॉडकडून गोळ्या घालून अतिफला देहदंड दिला जाणार आहे. 

दुबईतील कायद्यानुसार बुशराच्या आई-वडीलांनी अतिफला माफ केल्यास देहदंडाच्या शिक्षा माफ होऊ शकते. मात्र मुलीला मारणाऱ्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, असं बुशराच्या आईचं म्हणणं आहे.

बुशराच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी त्या झगडत आहेत. मात्र, आतिफला  शिक्षा सुनावल्याबद्दल आपल्याला कोणीही कळवले नसल्याचं आतिफचे नातेवाईक सांगतात.