मंगळ ग्रहावर उमलले फूल!

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, January 7, 2013 - 16:31

www.24taas.com, वॉशिंग्टन
मंगळावर जीवसृष्टी आहे का याचा तपास लावणाऱ्या वैज्ञानिकांना एक मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी या ग्रहावर खास पाकळ्या असलेल्या क्लस्टरचा शोध लावला आहे. यावरून मंगळावर फूल उमलत असतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या क्लस्टरला मार्शन फ्लॉवर म्हटले जाते, असे वृत्त न्यू यॉर्कच्या एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. या फुलाचे छायाचित्र नासाने मंगळावर पाठवलेल्या रोबोट क्युरिअसिटीने गेल्या महिन्यात पाठवले होते.
या छायाचित्रात मोती रंगातील या पाकळ्या एका टेकडीवरून निघताना दिसत आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अंतराळासंदर्भात रुची असणाऱ्या व्यक्तींनी इंटरनेटवर या संदर्भात चर्चा सुरू केली आहे.

या संदर्भात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. काहींच्या मते हे या टेकडीवर असलेले क्वॉर्टज (एक प्रकारचे खनिज) असू शकते. तर एकाने म्हटले की हे छायाचित्र एखाद्या उमलत असलेल्या फुलाच्या पाकळ्यांचे असू शकते.
या संदर्भात नासाचे जनसंपर्क अधिकारी गाय वेब्स्टर यांनी सांगितले, की छायाचित्रात असे वाटते की हे क्लस्टर त्या टेकडीचाच एक भाग आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही अशा प्रकारे शोध लावण्यात आला होता. मात्र नंतर लक्षात आले होते, की तो एक प्लास्टिकचा तुकडा आहे, जो क्युरिअसिटीतून खाली पडला होता.

First Published: Monday, January 7, 2013 - 16:30
comments powered by Disqus