अमेरिकेत ३२० ताशीचे चक्रीवादळ, २४ जणांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, May 22, 2013 - 09:38

www.24taas.com, झी मीडिया, ओक्लोहोमा
अमेरिकेच्या ओक्लोहोमा शहरात चक्रीवादळाने थैमान घातले असून, या वादळाने २४ जणांचा बळी एका दिवसात घेतला आहे. वादळाच्या तडाख्यात ओक्लोहोमा शहरातील अनेक वसाहतींचा चुराडा झाला असून, त्यात दोन प्राथमिक शाळाही आहेत. या पडझडीमुळे हे संपूर्ण शहर युद्धात उद्ध्वस्त झाल्याप्रमाणे दिसत आहे.
हे वादळ एक मैलभर रुंदीचे होते, वादळाने वार्‍याचा वेग दरताशी ३२० किमीपर्यंत वाढला होता. वादळात सर्वाधिक नुकसान ओक्लोहोमाच्या दक्षिणेकडील मुरे या उपनगराचे झाले. या वसाहतीत अनेक इमारतींचा चुराडा झाला व वसाहतीतील दोन प्राथमिक शाळा कोसळल्या.
ओक्लोहोमा शहराच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या वादळात ९१ लोक ठार झाले असून, त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शहरातील दोन रुग्णालयांत १४५ जखमींना दाखल करण्यात आले असून, त्यात ७० लहान मुले आहे. वादळाने उद्ध्वस्त झालेला मोठा परिसर अजून शोधणे बाकी असल्याने मृतांचा आकडा आताच सांगणे शक्य नाही, असे मुरे शहराच्या पोलीस खात्याने म्हटले आहे.
आपल्या मुलांची स्थिती जाणून घेण्यासाठी पालकांची धडपड चालू असून त्यांना सत्यस्थिती सांगताना मन विदीर्ण होत आहे, असे गव्हर्नर मेरीफालीन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ओक्लोहोमा येथे आणीबाणी जाहीर केली असून, तातडीची मदत पाठविली आहे. गेल्या ३६ तासांपासून तयार होणार्‍या या वादळाने अनेक इमारतींची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे.
वादळ ४0 मिनिटे ओक्लोहोमा शहरात फिरत होते. त्याने ३२ कि.मी. प्रवास केला. प्लाझा टॉवर्स या शाळेच्या ढिगार्‍याखालून अनेक मुलांना सुखरूप वाचविण्यात आले; पण दुसर्‍या शाळेत काय झाले याचे कोणतेही वृत्त नाही. तसेच या दोन्ही शाळांमध्ये किती विद्यार्थी होते, हे स्पष्ट झालेले नाही. महापौर फालिन यांनी युद्धस्तरावर बचावकार्य व्हावे यासाठी नॅशनल गार्डच्या ८० सदस्यांना तेथे तैनात केले असून आणखीही स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
बचावकार्याचे सदस्य घराघरांमध्ये जाऊन तेथे अडकलेल्या लोकांना मदत करीत आहेत. तर, ओक्लाहोमा शहरात एका भूमिगत नियंत्रण केंद्रातून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग काम करीत असल्याची माहिती या विभागाचे प्रवक्ते जेरी लोजका यांनी दिली.First Published: Wednesday, May 22, 2013 - 09:38


comments powered by Disqus