पाक वृत्तपत्रांची भारत विरोधी भूमिका

गेल्या मंगळवारी पाक सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचे शिर कापून नेल्याच्या घटनेबद्दल जगभरातून टीका होत असताना पाक वृत्तपत्रांनी मात्र आपल्या जनतेसमोर खरी परिस्थिती मांडली नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 11, 2013, 09:30 AM IST

www.24taas.com,इस्लामाबाद
गेल्या मंगळवारी पाक सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचे शिर कापून नेल्याच्या घटनेबद्दल जगभरातून टीका होत असताना पाक वृत्तपत्रांनी मात्र आपल्या जनतेसमोर खरी परिस्थिती मांडली नाही.
आरोप निराधार – द डॉन
कराचीतून प्रकाशित होणाऱ्या ‘द डॉन’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर या बातमीला दिले आहे. भारताने सुरूवातील सीमा रेषेचे उल्लंघन केले आणि या आरोपातून वाचण्यासाठी पाकवर आरोप केल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्याचे पाकने म्हटले होते. याचा बदला घेण्यासाठी भारताने मंगळवारी अशा प्रकारच्या घटनेचा आरोप लावला असल्याचेही यात म्हणण्यात आले आहे. पाक सैन्याने या ठिकाणाची चौकशी केली, तर अशी घटना कुठेच झाली नसल्याचे पाक प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले.
भारताचा कांगावा – द जंग
कराचीतून प्रकाशीत होणाऱ्या ‘द जंग’ने या घटनेचा भारतीय लष्कराच्या हवाला देत बातमी दिली आहे. मात्र, भारताचे आरोप निराधार असल्याचे पाक लष्कराच्या प्रवक्त्याचे वक्तव्य मुख्यत्वाने छापले आहे. यात पाक लष्कराच्या प्रवक्त्याचे नावही छापण्यात आले नाही. पण केवळ मोबाईलवर मिळालेल्या एक टेक्स्ट मेसेजचा हवाला देत हे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. हा आरोप भारताचा कांगावा आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियाचे लक्ष दुसरीकडे वळावे असा भारताचा उद्देश आहे.
परराष्ट्र मंत्र्यांची धमकी – द नेशन
लाहोर येथून प्रकाशित होणाऱ्या द नेशन या वृत्तपत्राने तटस्थ भूमिका घेतली आहे. या वृत्तपत्राने भारताची बाजू मांडली आहे. दोन सैन्य ठार झाल्याबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी धमकी दिल्याचे यात म्हटले आहे. यात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याचे वक्तव्यही देण्यात आले आहे परंतु, बातमी इतरांच्या मानने चांगल्या पद्धतीने मांडली आहे.

कोणत्याही धमकीसाठी तयार – द न्यूज
कराचीतून प्रकाशित होणाऱ्या द न्यूजने भारताच्या धमकीला उत्तर देणार असल्याचे पाक लष्कर प्रमुखांची बातमी मुख्यत्वाने प्रसिद्ध केले आहे. पाक लष्कर प्रमुख अशफाक परवेज कयानी यांनी धमकीला उत्तर दिले आहे. लष्कर प्रमुखांच्या एका कार्यक्रमाचे कव्हरेज केले आहे. त्यात नियंत्रण रेषेवर झालेल्या घटनेला थोडे महत्त्व देऊन पाक लष्कराच्या प्रवक्त्याचे वक्तव्य प्रकाशित केले आहे. ही एकतर्फी बातमी त्यांनी प्रसिद्ध केली आहे.