बनावट नोटा भारतात आणण्यासाठी चीनचा वापर

भारतात बनावट नोटांचा प्रसार करण्यासाठी पाकिस्तान चीनची मदत घेत असल्याचं समोर येतंय.

Updated: Apr 22, 2014, 04:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतात बनावट नोटांचा प्रसार करण्यासाठी पाकिस्तान चीनची मदत घेत असल्याचं समोर येतंय. भारतीय चलनाच्या बनावट नोटांचा प्रसार करण्यासाठी पाक तस्कर चीनचा माध्यम म्हणून वापर करीत असल्याची चिंता गुप्तचर संस्थांना सतावत आहे.
एरवी कोलंबो येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडून राजनैतिक बॅगामधून तसेच दोन आघाडीच्या कोरियर सेवांच्या माध्यमातून असे बनावट चलन पाठविले जात असल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. मात्र आता चीन हे बनावट भारतीय चलनाची ने-आण करण्याचे केंद्र म्हणून विकसित होत असून, ही चिंता करण्याची बाब मानली जात आहे.
फेडएक्स आणि डीएचएल या कोरियर कंपन्यात पार्सल म्हणूनही असे चलन येते. आर्थिक गुप्तचर परिषद (ईआयसी) च्या अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला; पण फेडएक्स आणि डीएचएल या दोन्ही कोरियर कंपन्यांनी बनावट चलनाच्या प्रसाराला मदत केल्याचा आरोप नाकारला आहे. बनावट भारतीय नोटा पाकिस्तानातून भारतात पाठविण्यासाठी नेपाळ व चीनचा वापर केला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.