`केवळ दीड लाखांसाठी... आईनंच विकलं होतं कसाबला`

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, October 21, 2013 - 07:57

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाबला परिस्थितीनंच यामार्गावर आणलं होतं, असा खुलासा पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार जुगनू मोहसिन यांनी केलंय.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्यानं सगळ्यांनाच हादरवून टाकलं होतं. या हल्ल्यात अजमल कसाब हा एकमेव जिवंत आरोपी पोलिसांच्या हाती सापडला होता. कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशी दिली गेली. आपल्या घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे अजमल कसाब दहशतवादी बनला होता. इतकच नव्हे तर त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांनीच त्याला केवळ दीड लाखांसाठी लष्कर-ए-तोयबाला विकला होता, असा खुलासा मोहसिन यांनी केलाय.
जुगनू यांच्या म्हणण्यानुसार, लष्कर ए तोयबानं मुंबईवर हल्ला करण्यासाठी खूप मोठा खर्च केला होता. या हल्ल्यात १६६ जण मारले गेले होते. कसौलीमध्ये ‘खुशवंत सिंह लिटररी फेस्टीव्हल’ दरम्यान बोलताना जुगनू मोहसिन यांनी ही माहिती दिलीय.

जुगनू मोहसिन यांच्या म्हणण्यानुसार, ‘माझ्या घरापासून कसाबचं गाव फरीदकोट १० मैल अंतरावर आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी दिल्लीमध्ये होते. आम्ही एका व्यक्तीला कसाबविषयी माहिती घेण्यासाठी फरीदकोट पाठवलं. त्या व्यक्तीनं परत आल्यावर कसाबच्या आईनं - नूरी लाईनं रडत रडत आपल्याकडून चूक झाल्याचं कबूल करत आपणंच त्याला केवळ पैशांसाठी लष्कराला विकल्याचं सांगितलं’.
कसाबच्या नार्को टेस्ट दरम्यान कसाबनं आपले वडील आमिर शाहबन कसाबनं त्याला पैशांसाठी दहशतवाद्यांना विकल्याचं सांगितलं होतं. आपल्या कुटुंबीयांच्या भल्यासाठी आपण दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचंही कसाबनं चौकशी दरम्यान म्हटलं होतं. मोहसिन यांच्या या स्पष्टीकरणामुळे कसाबनं तेव्हा खरंच म्हटलं होतं, हे अधोरेखित झालंय.
कसाबचे वडील आमिर शाहबन, आई नूरी लाई, छोटी बहिण सुरैय्या आणि भाऊ मुनीर २००८ च्या मुंबई नरसंहारानंतर फरीदकोट गाव सोडून पळून गेले होते. त्यानंतर ते इथं परत कुणालाही दिसले नाहीत. दरम्यान, जुगनू मोहसिन यांना तालिबानकडून अनेकदा ठार मारण्याच्या धमक्याही मिळाल्यात. परंतु, मोहसिन यांच्या म्हणण्यानुसार, इस्लामिक उग्रवादी समूह पाकिस्तानातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेरोजगार युवकांना आपल्या जाळ्यात ओढून दहशतवादाच्या मार्गाला लावत आहे. तसंच पाकिस्तानात तालिबान दहशतवादाला खतपाणी घालतंय. अशा तरुणांना ते चुकीच्या मार्गाला लावत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 20, 2013 - 18:49
comments powered by Disqus