स्नोडेनची भारतासह २० देशांकडे अभयाची याचना!

अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका हरएक प्रयत्न करतेय. त्यामुळे भेदरलेल्या स्नोडेननं भारतासह २० देशांकडे मदतीची याचना केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 10, 2013, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका हरएक प्रयत्न करतेय. त्यामुळे भेदरलेल्या स्नोडेननं भारतासह २० देशांकडे मदतीची याचना केलीय. पण, स्नोडेनला राजनैतिक शरण देऊन अमेरिकेशी वैर पत्करणार कोण? असा प्रश्न आता साऱ्या जगाला पडलाय.
विकिलिक्सचा कायदेशीर सल्लागार असलेल्या साराह हॅरिसन यानं स्नोडेनच्यावतीनं यासंबंधी इतर देशांकडे मदतीची याचना केलीय. स्नोडेनच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आलीय. यापूर्वी इक्वाडोर आणि आइसलँन्डकडे अशा पद्धतीची दोन वेळा अर्ज करण्यात आल्याचंही यामध्ये सांगितलं गेलंय.
विकिलिक्सनं दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०१३ रोजी विकिलिक्सचा कायदेशीर सल्लागार साराह हॅरिसन यांनी स्वत: हे अर्ज सादर केलेत. सोमवारी रात्री उशीरा मॉस्कोच्या शेरमेत्येवो विमानतळावर रशिया वाणिज्य दूतावास अधिकाऱ्याकडे याबद्दल निवेदन सुपूर्द करण्यात आलंय. यामध्ये स्नोडेनला अमेरिकेकडून असलेल्या धोक्याबद्दलही उल्लेख करण्यात आलाय. पुरावे म्हणून काही कागदपत्रंही यासोबत जोडण्यात आलेत. ही निवेदनं रशियाच्या वाणिज्य दूतावासाकडून मॉस्कोमध्ये संबंधित देशांच्या दूतावासांना पाठवण्याची प्रकिया सुरू करण्यात आलीय.

स्नोडेनला अभय देण्यासाठी भारतासह ऑस्ट्रिया, बोलिविया, ब्राझील, चीन क्युबा, फिनलँन्ड, फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, नेदरलँड, निकारागुआ, नॉर्वे, पोलंड, स्पेन, स्वीस कन्फेडरेशन तसंच व्हेनेझुएला या देशांकडे मदतीची याचना करण्यात आलीय.

अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड केल्याप्रकरणी तसंच अनेक गोपनीय दस्तावेज जाहीर करणारा स्नोडेन कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला हवाय. यामुळे अमेरिकेनं इतर देशांना स्नोडेनला शरण न देण्याची धमकी अगोदरच दिलीय. स्नोडेनचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याचं अमेरिकेनं कालच जाहीर केलंय. स्नोडेन प्रकरणाची निष्पक्षपणे सुनावणी होईल तसंच अमेरिकन नागरिक म्हणून तो त्याला असलेल्या सगळ्या अधिकारांचा वापर करू शकेल, असा दावाही अमेरिकेनं केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.