शिंदेंचं वक्तव्य तालिबानच्या पथ्यावर

संघ आणि भाजपप्रणित हिंदू दहशतवादाचं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केल्यावर आता तालिबाननेही त्यांची री ओढली आहे. काश्मीरमध्ये भाजपप्रणित हिंदू दहशतवादी संघटना कार्यरत असून संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही भारतातील काश्मीरवर हल्ला करू अशी धमकी तालिबानने दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 24, 2013, 04:51 PM IST

www.24taas.com, पेशावर
संघ आणि भाजपप्रणित हिंदू दहशतवादाचं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केल्यावर आता तालिबाननेही त्यांची री ओढली आहे. काश्मीरमध्ये भाजपप्रणित हिंदू दहशतवादी संघटना कार्यरत असून संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही भारतातील काश्मीरवर हल्ला करू अशी धमकी तालिबानने दिली आहे.
डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रात दिलेल्या बातमीनुसार टीटीपी प्रमुख एहसानुल्लाह एहसानने धमकी देताना भारताचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. भारतात हिंदू दहशतवादी आहेत, हे तेथील केंद्रीय गृहमंत्र्यांनीच कबूल केलं असल्याचं तालिबानने म्हटलं आहे. या हिंदू अतिरेकी संघटना काश्मीरमध्ये घातपात करतात. काश्मीरमधील अतिरेकी कारवाया हिंदू दहशतवादी भारतीय सरकारच्या संमतीने करतात, असं एहसानुल्लाह एहसानने म्हटलं आहे.
जर संयुक्त राष्ट्रांना भारतातील दहशतवाद संपवता येत नसेल, तर ते काम पाकिस्तानी तालिबान करून दाखवेल, अशी धमकी एहसान याने दिली आहे. लवकरच आपण हिंदू धार्मिक संघटना पुरस्कृत हिंदू दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ला करू आणि पाकिस्तानी तालिबानची ताकद दाखवून देऊ, असंही या धमकीत एहसानुल्लाहने म्हटलं आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पडल्याचं दिसून आलं आहे. शिंदेचं वक्तव्य आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना मदत करेल, अशी भाजपने दिलेली प्रतिक्रिया खरी ठरत असल्याचं दिसू लागलं आहे.