फ्रान्सवर हल्ला करणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याची ओळख पटली

फ्रान्समध्ये रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख पटलीय. करीम शेउर्फी असं त्याचं नाव आहे... 

Updated: Apr 22, 2017, 12:00 AM IST
फ्रान्सवर हल्ला करणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याची ओळख पटली title=

पॅरीस : फ्रान्समध्ये रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख पटलीय. करीम शेउर्फी असं त्याचं नाव आहे... 

पॅरीसच्या कॅम्प्स एलिसीस भागामध्ये आयसिसच्या एका संशयित अतिरेक्यानं पोलिसांच्या कारवर अत्याधुनिक रायफलमधून गोळ्या झाडल्या. यामध्ये एक पोलीस अधिकारी ठार, तर त्याचा सहकारी जखमी झालाय. 

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला अतिरेकी मारला गेलाय. आयसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय तसंच हल्लेखोराजवळ आयसिसशी संबंधित कागदपत्रंही पोलिसांच्या हाती लागली.

रविवारी फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूकत आहे. त्यापूर्वीच झालेल्या हल्ल्यामुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तर अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी या हल्ल्याच्या निमित्तानं परस्परांवर टीका करून राजकारण सुरू केल्याचंही चित्र आहे. 

पॅरीसवासियांनी घटनास्थळी जाऊन मृत पोलीस अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली तर फ्रान्सचे मावळते अध्यक्ष फ्रान्झ्वा ओलाँ यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.