जनतेचा विजय - बराक ओबामा

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, November 7, 2012 - 13:28

www.24taas.com,वॉशिग्टन
अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांची फेरनिवड झालीये. विजयानंतर ओबामांनी पहिल्या भाषणात हा जनतेचा विजय असल्याचं सांगत अमेरिकनवासीयांचे आभार मानले. या विजयानं अमेरिकेत जोरदार सेलिब्रेशन सुरू झालं असतानाच, भारतातल्या ओबामा प्रेमींनीही मुंबई-दिल्लीत जोरदार जल्लोष केला.
संपूर्ण अमेरिका हे एक कुटुंब आहे. अमेरिकेला कमजोर होऊ देणार नाही. अमेरिकेचा बेस्ट काळ अजून यायचाय. अमेरिकेच्या उज्जवल यशासाठी सर्वांनी मिळून काम करूया. यापुढं बरीच आव्हानं उभी असतील. अमेरिकेचा उदारमतवादावर विश्वास आहे. संघर्ष करणाऱ्या अमेरिकन नागरिकांकडून बरचं काही शिकलो. मला संघर्ष करण्याचे धडे येथे मिळालेत, असे उद्गार विजयानंतर बराक ओबामा यांनी काढले.
बराक ओबामा यांनी पुन्हा एकदा करुन दाखवलंय. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्याशी चुरशीच्या लढतीत ओबामांनी अखेरच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवलाय. ओबामा यांना ३०३ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर रोम्नी यांना २०३मते मिळाली आहेत. स्विंग स्टेटनं ओबामांच्या बाजून कौल दिल्यानं बराक ओबामा पुन्हा एकदा अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत.
दुस-या महायुद्धानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी सलग दुस-यांदा विराजमान होणारे ओबामा हे डेमोक्रेटीक पक्षाचे केवळ दुसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी बिल क्लिंटन यांनी हा इतिहास घडवला होता. ओबामा आणि रोम्नींमध्ये चुरशीची लढत होणार असं चित्र निर्माण झालं होतं. त्यानुसार मतमोजणीच्या सुरूवातीला अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे अखेर ओबामांनीच बाजी मारलीय.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी पराभव मान्य केलाय. बराक ओबामा यांचे आपण फोनवरून अभिनंदन केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी मतदारांचेही आभार यावेळी मानले. रोम्नी यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार चुरस वाढवली होती. मात्र स्विंग स्टेट्सन ओबामांना कौल दिल्यानं रोम्नी यांचा पराभव झाला.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनीही या विजयाबद्दल आनंद व्यक्त केलाय. ट्विटरवरून त्यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानलेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांच्या विजयाची बातमी कळताच भारतातही जल्लोष सुरू झालाय. मुंबईतल्या अमेरिकन दुतावासाच्या कार्यालयासमोर पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. अमेरिकन नागरिकांनी ओबामांच्या विजयानंतर विजयी जल्लोष साजरा करायला सुरूवात केलीये. तर दिल्लीतही जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झालीये. अमेरिकन कॉन्सिलेटसमोर नागरिकांनी एकत्र येत ओबामांच्या विजयाचा आनंद साजरा केला.

First Published: Wednesday, November 7, 2012 - 13:12
comments powered by Disqus