`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`

धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.

शुभांगी पालवे | Updated: Mar 12, 2014, 01:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही. सोशल मीडियावर या मुद्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय.
इस्लामी विचारधारा परिषद (सीआयआय)च्या म्हणण्यानुसार, कमी वयात विवाहावर बंदीदेखील गैर-इस्लामी आहे. कारण, इस्लाममध्ये लहान मुलांच्या विवाहावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही.
सीआयआयनं सरकारकडे आपल्या शिफारशी सोपवल्यात. या शिफारसी अंमलात आणायच्या किंवा नाही याचा निर्णय केवळ संसद घेऊ शकते.
याच मुद्यावर झालेल्या एका बैठकीनंतर सीआयआयचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद खान शीरानी यांनी, एखाद्या व्यक्तीला एकाहून अधिक पत्नी ठेवण्याची मुभा शरिया कायद्यात असल्याचं म्हटलंय. त्यामुळेच आम्ही सरकारला कायद्यात सुधारणा करण्याचा सल्ला दिल्याचं ते म्हणतायत. दुसरं लग्न करायचं असल्यास एखाद्या पुरुषाला आपल्या पत्नीची परवानगी घ्यायचीही काही एक गरज नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.
महत्त्वाचं म्हणजे, १९६१ च्या मुस्लिम कुटुंब कायद्यानुसार, पुरुषाला दुसऱ्या लग्नासाठी आपल्या पहिल्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता आहे. परंतु, हे शरिया कायद्याच्या अगदी विरुद्ध असल्याचं शीरानी यांचं म्हणणं आहे.
विवाह, घटस्फोट आणि वारसा हक्कासंबंधी कायद्या सरकारनं शरिया कायद्यानुसार बदलाव करावेत, असं त्यांनी म्हटलंय. सीआयआयच्या या शिफारशींची सोशल वेबसाईटवर मात्र चांगलीच खिल्ली उडविली गेलीय. मुख्य म्हणजे पुरुषांनीदेखील या शिफारशींविरुद्ध आपली मतं नोंदविली आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.