वर्ल्ड बँक म्हणते `भारतापेक्षा पाकिस्तान बरं!`

सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणे कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यासगटानं केलीये. वर्ल्ड बॅंक आणि आयएफसीच्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता भारताचा क्रमांक 132 वा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 31, 2012, 07:25 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणे कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यासगटानं केलीये. वर्ल्ड बॅंक आणि आयएफसीच्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता भारताचा क्रमांक 132 वा आहे.
उद्योग-व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे का ? याबाबत वेगवगेळ्या कसोट्या लावून वर्ल्ड बॅकेंच्या अभ्यासगटानं अहवाल तयार केलाय. या सर्व्हेक्षणात भारतातल्या उद्योगस्थितीबाबत प्रतिकूल टिप्पणी केलीये. 185 देशांमध्ये भारताचा क्रमांक 132 वा आहे. पहिल्या शंभर देशांमध्येही भारत नाही. गंभीर बाब म्हणजे व्यापा-यात भारताचे शेजारी पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ या देशांची स्थिती भारतापेक्षा अनुकूल असल्याचा शेरा या अभ्यासगटानं मारला आहे. मध्यम आणि लघु उद्योगांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याचं भारतातले उद्योजकही मान्य करतात. उद्योजकांना मदत केल्यावर मला फायदा काय ? ही वृत्ती बदलली तरच भारताचा क्रमांक वरती येईल, असं मत व्यक्त होतंय.
उद्योगांना मदत करण्यासाठी असणा-या सरकारी संस्था या मदतीऐवजी अडथळेच जास्त आणतात. असाही काही उद्योजकांचा अनुभव आहे. मनुष्यबळासह जमीन, वीज, पाणी, सरकारी धोरण या सर्व बाबींचा उद्योग उभारणीवर परीणाम होत असतो. नोकरशाही किंवा उद्योग विश्वाला मदत करणा-या सरकारी संस्था तसेच राजकारणीही जोपर्यंत आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलत नाहीत तोपर्यंत भारतात उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही. हे चित्र बदलण्यासाठी सर्वच क्षेत्रांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळं उद्योगविश्वात चिंतेचं वातावरण आहे.