हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक

अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

Updated: May 29, 2016, 04:11 PM IST
हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक title=

मुंबई : अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. आता पुन्हा एकदा हे त्रिकूट प्रेक्षकांना हसवायला येत आहे. हेरा फेरी 3 मध्ये हे तिघं पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 

या आधी या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम काम करणार होते, पण या दोघांऐवजी आता अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी या सिक्वलमध्ये दिसतील. 

कलाकारांबरोबरच चित्रपटाच्या दिग्दर्शकामध्येही बदल करण्यात आला आहे. या आधी जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनसाठीच्या चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज व्होरा करणार होते, पण आता अहमद खान यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

निर्माता फिरोज नाडियाडवालाबरोबरचे अक्षयचे मतभेदही आता दूर झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच आता नीरज व्होरा या चित्रपटाच्या स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्टवर लक्ष देणार आहे, तर अहमद खान दिग्दर्शन करेल. ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. 

अभिषेक आणि जॉनसाठी लिहिलेल्या स्क्रीप्टमध्येही आता बदल करण्यात आले आहेत. फिर हेरा फेरी जिकडे संपला तिथून म्हणजेच राजू बंदूक घेऊन जातो, तिथून हा चित्रपट सुरु होईल आणि बाबुराव आणि घनश्याम त्याचा शोध घेतील.