फिल्म रिव्ह्यू : 'एबीसीडी २' डान्सची फसलेली पॅशन!

Updated: Jun 20, 2015, 08:21 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'एबीसीडी २' डान्सची फसलेली पॅशन! title=

 

सिनेमा : एबीसीडी २
दिग्दर्शक : रेमो डिसूझा
निर्माता : सिद्धार्थ रॉय कपूर
कलाकार : वरुण धवन, प्रभू देवा, राघव जुयाल, श्रद्धा कपूर, धर्मेश येलांडे
संगीत : सचिन - जिगर
वेळ : १५४ मिनिटे

 

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा दिग्दर्शित 'एबीसीडी २'च्या प्रोमोकडे पाहता हा एक संपूर्ण नृत्यावर बेतलेला सिनेमा असेल... ज्यात डान्सर्सचं आयुष्य आणि त्यांच्या पॅशनला रूपेरी पडद्यावर आणलं जाईल, अशी अपेक्षा होती. सोबतच 'एबीसीडी २'चं कथानक एका सत्यघटनेवर आधारित आहे असं म्हटलं गेलंय. 

 

हिप-हॉप डान्स चॅम्पिअनशिप जिंकणाऱ्या आणि मुंबईतील नालासोपारामध्ये राहणाऱ्या विष्णु, सुरेश आणि विनी नामक डान्सर्सची ही कहाणी 

'एबीसीडी २'मध्ये रेमोला प्रभू देवाची साथ मिळाली आहे. पण या फिल्ममध्ये काही गाण्यांचा अपवाद सोडला तर यात पाहण्यासारखे काहीच नाही. फक्त गाणी संपूर्ण फिल्ममध्ये जीव ओतू शकत नाहीत. या चित्रपटाने कथानक आणि संवादामध्येही प्रेक्षकांची निराशा केलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कथानक
या फिल्मचे कथानक डान्सर सुरेश (वरूण धवन) आणि त्याच्या मित्रांभोवती फिरत राहतं... त्यांच्यावर नक्कल केल्याचा आरोप ठेवून स्पर्धेबाहेर केले जाते. त्यामुळे सुरेशला हा फार मोठा अपमान वाटतो. कारण त्याची आई पद्मश्री पुरस्कारप्राप्त नृत्यांगना असते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो प्रसिद्ध डान्सर विष्णु (प्रभू देवा)कडे नृत्याचे धडे घ्यायला लागतो. शेवटी सगळे लास वेगासला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोहोचतात आणि तिरंगा घेऊन देशासाठी नाचतात. या साऱ्यात सुरेश आणि विनी (श्रद्धा कपूर) यांच्यातील रोमान्स वेगळाच रंग भरतो. 

या साऱ्या गोंधळामध्ये जी ड्रामेबाजी केलेली आहे ती नाटकी आणि हास्यास्पद वाटते. सुरेशचा एक मित्र पिझ्झा डिलीव्हरी बॉय असतो ज्याला लोक पैसे देत नाहीत कारण त्याने चिटिंग केलेली असते. हा सिनेमा थ्रीडीमध्ये काही प्रमाणात चांगला वाटतो. 

अभिनय
प्रभूदेवाच्या मागील फिल्म 'एबीसीडी'मधील विष्णू सर हाच रोल पुढे वाढवला गेलाय. सोबत बरेच छोटे-मोठे डान्सर या फिल्ममध्ये आपल्याला दिसतात, ज्यांना फारसं कुणी ओळखत नाही. 

या सिनेमात श्रद्धा आणि वरूणने फार चांगलं काम केलंय पण तेवढं फिल्मसाठी पुरेसं नाही. या फिल्मचं संगीतही फारसं उठावदार नाहीय. सुरेश आणि विष्णुच्या संघर्षाची ही गोष्ट आहे ज्यात ते शेवटी यशस्वी होतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.