रिव्ह्यू 'बायोस्कोप': चार कथा, चार कविता - एक जबरदस्त बायोस्कोप

चार दिग्दर्शक चार कथा, चार कविता आणि १८ कलाकार.. असा मराठी रुपेरी पडद्यावरचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे बायोस्कोप हा सिनेमा... एकाच सिनेमात चार शोर्ट फिल्म्स... 

Updated: Jul 17, 2015, 12:37 PM IST
रिव्ह्यू 'बायोस्कोप': चार कथा, चार कविता - एक जबरदस्त बायोस्कोप title=

जयंती वाघदरे, झी मीडिया, मुंबई: चार दिग्दर्शक चार कथा, चार कविता आणि १८ कलाकार.. असा मराठी रुपेरी पडद्यावरचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे बायोस्कोप हा सिनेमा... एकाच सिनेमात चार शोर्ट फिल्म्स... 

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'दिल-ए-नादान', विजू माने दिग्दर्शित 'एक होता काऊ', गिरीश मोहितेचा 'बैल' आणि रवि जाधव दिग्दर्शित 'मित्रा' या चारही शॉर्ट फिल्म्स अर्थातच 'बायोस्कोप' कसा आहे पाहूया...

मी तुम्हाला जसे म्हटलं की बायोस्कोप या एकाच सिनेमात आपल्याला ४ दिग्दर्शकांची चार वेगवेगळी कलाकृती अनुभवायला मिळणार आहे.. आपण सुरुवात करुया गजेंद्र अहिरे दिग्दर्शित नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर स्टारर दिल- ए-नादान या सिनेमापासून..  

दिल- ए-नादान

दिल- ए-नादान ही कथा आहे शास्त्रीय संगीतात कमालीचं योगदान असलेल्या एका गायिकेची... आपल्या क्षेत्रातून जवळ-जवळ रिटायर्डमेंट घेतल्यानंतर म्हातारपणी आपल्या भुतकाळातल्या आठवणींचा खजिना घेऊन आयुष्य जगणाऱ्या एका कलाकाराची व्यथा यात मांडण्यात आली आहे.  'दिल- ए-नादान तूझे हुआ क्या है आखिर इस दर्द की दवी क्या है'.. गालीब यांची ही कविता आणि या सिनेमाची कथा एकदम कनेक्टेड वाटते.

अभिनय 
अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा अभिनय लाजवाब झालाय.  सिनेमा पाहताना त्या खरंच त्या व्यक्तिरेखेच्या दुखाची जाणीव करुन देते. या सिनेमाची मांडणी, यातले संवाद, कलाकारांचा अभिनय, ते लोकेशन सर्वकाही मॅजिकल वाटतं. याचं श्रेय नक्की दिग्दर्शकाला मिळायलाच हवं. गजेंद्र अहिरेनं सिनेमातचा विषय आणि गालिब यांच्या कवितेचा विचार करता सिनेमाला अचूक ट्रीटमेंट दिली आहे.

एक होता काऊ

दिल ए नादानंतर बोलूया विजू माने दिग्दर्शित 'एक होता काऊ' या शॉर्ट फिल्मबद्दल... या सिनेमाचा लूक त्याचं सादरीकरण हे कंप्लीट वेगळं आहे. खूप एक्सपेरिमेंटल आहे. 'एक होता काऊ' ही गोष्ट आहे एका सावळ्या मुलाची ज्याची तुलना त्याच्या रंगामुळं नेहमी कावळ्यासोबत केली जाते. या मुलाचं एका अत्यंत देखण्यामुलीवर प्रचंड प्रेम असतं. कवी सौमित्रनं लिहलेल्या या कविताची योग्य अशी मांडणी दिग्दर्शक विजू मानेनं केली आहे. 

अभिनय 
चाळीत राहणाऱ्या दोन तरुणांची प्रेम कहाणी यात रेखाटण्यात आली आहे. अभिनेता कुशल बद्रीकेनं यात सुंदर अभिनय केला असून, त्याच्यासाठी हा सिनेमा नक्कीच पाथ ब्रेकर ठरणार आहे यात शंका नाही. खरं सांगायचं तर यातल्या या चारही शॉर्ट फिल्म्स कलाकारांच्या नसून फक्त दिग्दर्शकांच्या आहेत. 'एक होता काऊ' हा सिनेमा पाहिल्यावरही हेच जाणवतं.

'बैल'

या चार शॉर्ट फिल्म्सपैकी एक म्हणजे बैल. बैल या सिनेमाची कथा कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर आधारीत आहे. उन्हातान्हात अतिशय कष्टानं जगणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्याची कथा आणि व्यथा सांगणारा हा सिनेमा आहे. मंगेश देशाई या नटाचा अभिनय कमाल आहे.

'मित्रा'

रवी जाधव दिग्दर्शित मित्रा हा सिनेमा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळाची गोष्ट...  समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा हा सिनेमा. सुमित्रा आणि विन्या यांच्या मैत्रीची गोष्ट.. १९४७ च्या काळातला हा सिनेमा असल्यामुळे सिनेमाचं सादरीकरणही त्याच स्टाईलनं त्यानं केलाय.

एक अतिशय संवेदनशील कथा इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं मांडण्याचं काम रवी जाधवनं उत्तम पार पाडलंय. या सिनेमातला वीणा जामकरचा परफॉर्मन्सही उल्लेखनिय आहे.

या सगळ्या गोष्टी प्रयोगशील वाटतात. बॉलिवूडमध्ये असा प्रयोग याआधी झालाय. पण मराठी सिनेजगतात हा प्रयोग पहिल्यांदाच पहायला मिळतोय. यात सोने पे सुहागा म्हणजे बायोस्कोप या सिनेमाला लाभलेला गुलजार यांचा आवाज. यातल्या कविता स्वत: गुलजार यांच्या आवाजात सादर करण्यात आल्या आहेत.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही या सिनेमाला देतोय ३.५ स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.