फिल्म रिव्ह्यू : ‘रेगे’चा अंडरवर्ल्डमधला थरारक प्रवास

Last Updated: Friday, August 15, 2014 - 13:29
फिल्म रिव्ह्यू : ‘रेगे’चा अंडरवर्ल्डमधला थरारक प्रवास

चित्रपट : रेगे
दिग्दर्शक : अभिजीत पानसे
कलाकार : महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, आरोह वेलनकर
लेखक : अभिजीत पानसे
संगीत : अवधूत गुप्ते
संवाद : प्रवीण तारडे, अभिजीत पानसे

 
जयंती वाघदरे (प्रतिनिधी) : ‘रेगे... तुमच्या मुलाकडे तुमचं नीट लक्ष आहे काय...?’ अशी टॅगलाईन घेऊन आलेल्या या सिनेमाची कथा अनिरुद्ध रेगे या तरुणाभोवती फिरते. हा अनिरुद्ध खरं तर मेडिकलचा विद्यार्थी. मात्र, नको त्या मित्रांच्या संगतीत येतो, आणि त्याला अंडरवर्ल्डचं ग्लॅमर खुणावू लागतं. त्यात तो कसा अडकत जातो, हे या सिनेमात आपल्याला पहायला मिळतं. याला जोड मिळालीये ती पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांच्यातल्या थरारक गँगवॉरची... महेश मांजरेकर आणि पुष्कर श्रोत्री एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस ऑफिसर... संतोष जुवेकर आणि विजू मानेची भाईगिरी आणि या दोन्हींमध्ये भरडला जाणारा, उच्चशिक्षित घरातील कॉलेजकुमार अनुराग रेगे म्हणजेच अभिनेता आरोह वेलणकर… एकूण अशी या फिल्मची कथा आहे... कोण कुणाची कशी सुपारी घेतो... पोलीस खात्यातही षडयंत्र कशी रचली जातात… याचा थरार पडद्यावर पाहणं मनोरंजक ठरतं.
 
अभिनय
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अभिनेता महेश मांजरेकर यांनी रेगे या सिनेमात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा रंगवलाय. तर दुसरीकडे पुष्कर श्रोत्रीने थंड डोक्याचा पोलीस ऑफिसर सचिन वाझे रंगवताना ब-याच बारिकसारिक गोष्टींचा होमवर्क केल्याचं दिसून येतं. खरं तर प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे दोघंही मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये गाजलेली नावं..या दोघांची देहबोली, त्यांचा गेटअप हुबेहूब साधण्याचा प्रयत्न महेश मांजरेकर आणि पुष्करने उत्तमरित्या सांभाळलाय. अर्थात त्यांचा हा गेटअप अधिक खुलवण्याचं श्रेय मेकअपमन विक्रम गायकवाड आणि संतोष गायके यांनाही तितकच जातं. अनुभवी आणि मुरब्बी कलाकार म्हणून ओळख असलेल्या मांजरेकरांकडून मात्र नक्कीच आणखी तजेलदार अभिनयाची अपेक्षा होती. 

संतोष जुवेकरला त्या तुलनेनं सिनेमात छोटी भूमिका आहे. मात्र पडद्यावरचा त्याचा अपिअरन्स, त्याची भाईगिरी चांगलीच भाव खाऊन जाते. 
 
या त्रिकुटासमोर अभिनयाच्या बाबतीत अगदीच नवखा असलेला अनिरुद्ध रेगे, म्हणजेच आरोह वेलणकर अभिनयाच्या बाबतीत उजवा ठरलाय. एक साधासुधा कॉलेजियन विद्यार्थी आरोहने चांगलाच रंगवलाय. भांबावलेला, गोंधळलेला, भीतीने घाबरलेला रेगे रंगवताना त्याने भूमिकेत खऱ्या अर्थानं जान आणलीय.  दिग्दर्शक अभिजीत पानसेचा जीवलग मित्र विजू मानेचा व्हिलनही सिनेमात एक थरारक झलक देऊन जातो.      
 
दिग्दर्शन
रेगेमुळे मराठी सिनेसृष्टीला आणखी एक नव्या दमाचा उत्तम दिग्दर्शक मिळालाय. अभिजीत पानसे... पहिलाच सिनेमा, मात्र तरीही नियोजित आणि योग्य, परिपूर्ण होमवर्क यांमुळे रेगे खऱ्या अर्थी उठावदार झालाय. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा या एन्काऊंटर स्पेशालिस्ट ऑफिसर्सचं थ्रील, गँगवॉर, बिल्डर लॉबी, पैशाचा अतिरेकी मोह, या सगळ्याच बाजू पडद्यावर कशा मांडायच्या याचं अचूक गणित दिग्दर्शकाच्या मनात स्पष्ट होतं... रेगे पाहताना हे कळून येतं आणि म्हणूनच हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होताना दिसतो. 
 
संगीत
रेगेचं म्युझिक आहे अवधूत गुप्तेचं... ‘शिट्टी वाजली’ हे आयटम साँग तुम्हाला ठेका धरायला लावतं. खास अवधूत गुप्ते स्टाईल गाणी तुम्हाला या सिनेमात बघायला मिळतील. रेगेची घालमेल आणि व्यथा मांडणारं गाणंही तुम्हाला गुंतवून ठेवतं. सिनेमा सस्पेन्स थरार असल्याने सिनेमाचं बॅग्राऊंड म्युझिकही खिळवून ठेवतं. 
 
शेवटी काय तर... 
तुम्हाला जर सस्पेन्स, थरार, अंडरवर्ल्डमधलं गँगवॉर असा सगळा मसाला पहायचा असेल, तर तुमच्यासाठी हा सिनेमा अगदी परफेक्ट आहे. मात्र, याआधी आलेल्या सिनेमांपेक्षा यात नवीन काय, वेगळं काय,  अशा गोष्टी शोधायला जाऊ नका. तिथं तुमची निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हो, दिग्दर्शक अभिजीत पानसेनं केलेला हा पहिलाच प्रयत्न असल्यामूळे या सगळ्या गोष्टी पाहता त्याची मांडणी उल्लेखनीय आहे.. 
 
रेटिंग
पोलिसी खाकीतलं छुपं युद्ध, ग्लॅमरस लाईफस्टाईलची भुरळ असा मालमसाला असूनही कुठेही तोल ढळू न देणारी हा सिनेमा एक छान एन्टरटेनर ठरतो. अनुभवी कलाकारांना, नवख्या कलाकारांच्या अभिनयाची मिळालेली जोड आणि दिग्दर्शकाचा प्रामाणिक प्रयत्न, खिळवून ठेवणारा एक धाडसी सब्जेक्ट, या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही या फिल्मला देतोय 3.5 स्टार...  

 

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Friday, August 15, 2014 - 13:22
comments powered by Disqus