'मराठीसाठी १२ ते ९ मधील हवी ती वेळ देऊ'

मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांच्या प्रसारणासाठी दुपारी १२ ते रात्री ९ ची वेळ देण्याची तयारी मल्टीप्लेक्स मालकांनी दाखवली आहे.

Updated: Apr 9, 2015, 11:14 PM IST
'मराठीसाठी १२ ते ९ मधील हवी ती वेळ देऊ' title=

मुंबई : मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांच्या प्रसारणासाठी दुपारी १२ ते रात्री ९ ची वेळ देण्याची तयारी मल्टीप्लेक्स मालकांनी दाखवली आहे.

मल्टीप्लेक्सच्या मालकांनी गुरूवारी ही हमी राज्य सरकारला दिली. मराठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहचालकांची बैठक गुरुवारी दुपारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विधान भवनात झाली. त्यानंतर या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल माहिती देण्यात आली. 

सरकारच्या २०१०च्या आदेशानुसार मल्टिप्लेक्समध्ये दुपारी १२, ३ सायंकाळी ६ आणि रात्री ९ या सर्व प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक आहे. 

या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली होती. 

मराठी प्रेक्षक हे प्रामुख्याने दुपारीच चित्रपट पाहणे पसंत करतात. रात्रीच्या खेळांना मराठी प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद नसतो. त्यामुळे या वेळेत मराठी चित्रपट कमी दाखवले जातात, असा युक्तिवाद चित्रपटगृहचालकांनी केला होता.

मात्र, मराठी चित्रपट प्राइम टाइमला दाखवले जात असले तरी सायंकाळी ६ आणि ९ ची वेळ मराठी चित्रपटांसाठी देण्यास मल्टिप्लेक्सकडून टाळाटाळ केली जाते, ही वेळ मराठी चित्रपटांना मिळायला हवी, अशी मागणी मराठी निर्माता-दिग्दर्शकांनी केली आहे. 

तावडे यांच्या निर्णयाचे मराठीजनांकडून स्वागत करण्यात आले होते. तर बॉलिवूडमधील काही जणांनी त्यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी चित्रपटगृहमालक, मराठी चित्रपट निर्माते आणि तावडे यांची बैठक झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.