सोशल मीडियावर सैराटची वर्षपूर्ती साजरी

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. सोशल मीडियावर सैराटच्या वर्षपूर्तीनिमित्त मेसेजही व्हायरल होतायत. 

Updated: Apr 29, 2017, 03:39 PM IST
सोशल मीडियावर सैराटची वर्षपूर्ती साजरी title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. सोशल मीडियावर सैराटच्या वर्षपूर्तीनिमित्त मेसेजही व्हायरल होतायत. 

न भूतो न भविष्यती असे यश या सिनेमाने मिळवले होते. सैराट आजच्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिल २०१६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सैराट सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याची गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. सिनेमाचे ट्रेलर पाहता हा हिट होईल इतकी खात्री होती. 

मात्र इतक्या भव्य प्रमाणात हा सिनेमा हिट होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. १०० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला. सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. 

या सिनेमाची लोकप्रियता इतकी वाढली की थिएटरमधील अनेक शोची संख्या वाढवावी लागली त्यासोबतच पहाटे, रात्रीचे शो सुरु करावे लागले. या सिनेमाने रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्यासह अनेकांना स्टार बनवले. सिनेमाने जितके लोकांना हसवले, मनोरंजन केले तितकेच जाता जाता त्यांच्या डोळ्यात अंजनही घातले.