'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?

 राजू शेट्टी यांचं  नाव एव्हाना महाराष्ट्राच्या खेड्यानपाड्यांत पोहचलंय. कांद्याला योग्य भाव मिळवून देणं असो किंवा ऊसतोडणी कामगारांचा लढा... राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाचा पक्ष हक्कानं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलेला महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय... त्यामुळेच हा महाराष्ट्रही लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा राहिलात. आता, विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी नावाचा दबदबा दिसून येतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Updated: Oct 2, 2014, 01:13 PM IST
'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?  title=

मुंबई : राजू शेट्टी यांचं  नाव एव्हाना महाराष्ट्राच्या खेड्यानपाड्यांत पोहचलंय. कांद्याला योग्य भाव मिळवून देणं असो किंवा ऊसतोडणी कामगारांचा लढा... राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाचा पक्ष हक्कानं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलेला महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय... त्यामुळेच हा महाराष्ट्रही लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा राहिलात. आता, विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी नावाचा दबदबा दिसून येतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून तब्बल १ लाख ७७ हजार मतांनी विजय मिळवत, त्यांनी आपला दबदबा दाखवून दिलाय. या निवडणुकीत त्यांना एकूण ६,४०,४२८ मतं मिळाली होती तर त्यांचे विरोधक आणि काँग्रेसचे उमेदवार कलप्पा आवाडे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. 

ऊसाला ३००० रुपये दर दिला जावा, अशी मागणी करत उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं त्यांना काही दिवस जेलमध्येही काढावे लागलेत. आंदोलकांच्या या हिंसक आंदोलनात एका शेतकऱ्याचा गोळीबारात तर एकाचा पेटवापेटवी करताना मृत्यू झाला.

पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी यांचा दबदबा जाणून घेत भाजप-सेनेच्या युतीनं त्यांना 'महायुती'त सामील करून घेण्यात यश मिळवलं होतं. पण, आता 'युती'चा घटस्फोट झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून स्वाभिमानीला १८ जागा सोडण्यात आल्या होत्या. 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ज्या जागा हव्या होत्या त्या सर्व जागा युतीमध्ये शिवसेनेकडे होत्या... त्यामुळे, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी, राजू शेट्टी यांनी सांगितलंय. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चांदवड - गोविंद पागर, पाथरी - विजय सिताफळे, करमाळा - संजय शिंदे, पंढरपूर - प्रशांत परिचारक हे उमेदवार सध्या भाजपच्या साथीनं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.