सीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.

Updated: Oct 7, 2014, 07:26 AM IST
सीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात! title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.

ऑक्टोबर हिटचे चटके सध्या महाराष्ट्रातील जनतेला जाणवतायत... त्यातच निवडणुकीचं वातावरणही तापलंय... अशा गरमागरम माहौलमध्ये भर टाकलीय ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... मोदींच्या नावावरच मतं गोळा करण्याची व्यूहरचना भाजपनं आखल्यानं, मोदींना सध्या हरियाणा आणि महाराष्ट्र अशा चकरा माराव्या लागतायत. एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना आणि त्यामध्ये जवान शहीद होत असताना, देशाचे पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात व्यस्त असल्यानं आता टीका होऊ लागलीय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यानिमित्तानं मोदींवर तोफ डागलीय.

केवळ मोदीच नव्हेत, तर नितीन गडकरी, राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे असे केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेकजण सध्या प्रचारासाठी महाराष्ट्रात मुक्काम ठोकून आहेत. तुळजापूरच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी या मोदी सेनेला चक्क अफजलखानाच्या सेनेची उपमा दिली.

आतापर्यंत कुणाही पंतप्रधानानं विधानसभेच्या निवडणुकीत कधी एवढा रस दाखवला नव्हता, अशी टीका ट्विटरवरून शरद पवारांनीही केली. पाकिस्तानच्या घुसखोरीमुळं मोदी आणि भाजपच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांना आयतं कोलित मिळालंय. संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणारे अरूण जेटली केवळ इशारे देण्यात वेळ घालवतायत, अशा परिस्थितीत राजकीय विरोधकांचा आणि पाकिस्तानचा हल्ला मोदी कसे परतवून लावणार, याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.