आज होणार प्रचाराचा शेवट, नेत्यांना शेवटची संधी

अत्यंत चुरशीनं लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत.

Updated: Oct 13, 2014, 10:45 AM IST
आज होणार प्रचाराचा शेवट, नेत्यांना शेवटची संधी title=

मुंबई : अत्यंत चुरशीनं लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत.

प्रथमच पंचरंगी होत असलेल्या या निवडणुकीचा प्रचारही रंगतदार झालाय. युती आणि आघाडीत तुटल्यानं मतदारांना काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसे यांसह अनेक लहान - मोठया पक्षांचा पर्याय मतदानासाठी आहे.

आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळं या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा  मोठा धुराळा उडालाय. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे  प्रश्न मात्र बाजुला पडलेत. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवत निवडणुक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याचं स्पष्ट केलंय. मोदींसोबत भाजपनं राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांची मोठी फौजच रणांगणात उतरवलीय.

दुसरीकडे शिवसेनेनंही मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत भाजपसह सर्वच पक्षांवर घणाघाती टिका करत जोरकसपणे प्रचार केलाय. उद्धव ठाकरेंनी राज्यभर सभा घेत शिवसेनेसाठी वातावरण तापवलंय.

काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. सोनिया गांधींबरोबरच राहुल गांधींनीही प्रचारात भाग घेत नरेंद्र मोदींनी लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा स्वत: शरद पवार यांनी हातात घेऊन ही निवडणुक राष्ट्रवादीसाठी किती महत्वाची आहे हे दाखवून दिलयं.

तर, आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज ठाकरेंच्या सभांनीही मनसेसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. 

प्रत्येक पक्षानं विजयाचा दावा केला असला तरी मतदार 15 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानात कोणाला कौल देतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. मतदारांचा कौल 19 ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.

प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या कोठे सभा आहेत त्यावर एक नजर टाकूया...
नरेंद्र मोदी - पालघर, रत्नागिरी, कणकवली
शरद पवार -  जुन्नर, श्रीगोंदा, दौंड, सासवड
पृथ्वीराज चव्हाण - कराड
राज ठाकरे -  मुंबई
उद्धव ठाकरे - धुळे, नंदुरबार, मुक्ताईनगर
अजित पवार - पुणे, वडगाव शेरी, खडकवासला

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.