जेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!

जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. 

Updated: Sep 29, 2014, 12:46 PM IST
जेलमध्ये बाबा,  प्रचाराचा मुलांकडे ताबा! title=

जळगाव : जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. 

जळगाव शहर तसचं ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काही उमेदवारांचा मुक्काम सध्या जेलमध्ये आहे. घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर हे सध्या धुळे जिल्हा कारागृहात जेलची हवा खात आहेत. मात्र, तरीही सुरेश जैन यांनी शिवसेनेकडून अधिकृत अर्ज भरला असून देवकरांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालीय.

हे नेते जेलमध्ये असल्यानं या दोन नेत्यांच्या उच्चशिक्षित मुलांनी प्रचारमध्ये उडी घेतलीयं. २०१२ पासून सुरेश जैन जेलमध्ये असल्याने त्यांच्या समर्थकांनी आत्तापर्यंत कधीही राजकारणात सक्रिय नसलेले त्यांचे चिरंजीव राजेश जैन यांना प्रचाराच्या रणांगणात उतरवण्यात आलंय. 

अशीच परिस्थिती शेजारच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात निर्माण झालीय, घरकुल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर हेही नऊ महिन्यांपासून कारागृहात आहेत. देवकर मंत्री असताना त्यांचे जेष्ठ चिरंजीव विशाल देवकर हेही राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र, वडील जेलमध्ये असल्याने त्यांचे जेष्ठ सुपुत्र विशाल देवकर यांनाही थेट प्रचाराच्या राजकीय रणधुमाळीत उडी घ्यावी लागलीय.  

नेते जेलमध्ये आणि मुले राजकीय आखाड्यात त्यामुळे जळगावमधील या दोन माजी मंत्र्यांच्या जेलमधील या लढती साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता जेलमध्ये असलेल्या आपल्या वडिलांना ही मुलं विजय मिळवून देतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.