मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे. 

Updated: Oct 20, 2014, 09:39 PM IST
मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार? title=

मुंबई: लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर मनसेची मान्यता धोक्यात आलीय. रेल्वे इंजिन चिन्हं राखण्यासाठीही आता मनसेला झगडावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार विजयी झाला आहे. मार्च २०१० मध्ये मनसेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती.  

एकही मारा लेकीन सॉलीड मारा....

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत युतीला विशेषतः शिवसेनेला दणका दिल्यानंतर राज ठाकरेंच्या तोंडून निघालेला हा डायलॉग... आता लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मनसेचा जो मानहानीकारक पराभव झाला त्यानंतर मनसेची अवस्था 'इतना सन्नाटा क्यो है भाई...? अशीच झालीय. नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि कार्यकर्त्यांत नाराजी.... असं का घडलं ?

अमराठी वाद नाकारला

पक्ष स्थापनेच्या वेळी विकासाची स्वप्नं दाखवणाऱ्या राज ठाकरेंना यश मिळालं नाही, तेव्हा मराठी-उत्तर भारतीय वादाच्या निमित्तानं मराठीचा मुद्दा पेटवला आणि घवघवीत यश मिळवलं. पण या मुद्यावर पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकता येत नाहीत याचा प्रत्यय आता त्यांना आला असेल. म्हणूनच मराठी-उत्तर भारतीय मुद्याची तीव्रता कमी झाल्यानं आणि या निवडणुकीत अन्य कोणताही मुद्दा नसल्यानं राज ठाकरेंनी मराठी-गुजराती वाद उखरून काढला खरा, पण मतदारांनी तो साफ नाकारला.

केवळ विकासाची स्वप्न नको

निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बहुचर्चित ब्ल्यु प्रिंट सादर केली. पण विकासाच्या मुद्यावर महापालिकेची सत्ता जिंकणाऱ्या नाशिकमध्येच मनसेचं पानिपत झालं. नाशिकच्या जनतेनं अडीच वर्षाचा कारभार पाहून, मनसेला असा काही ठोसा सॉलिड मारला की, मनसे आमदारांची संख्या ३ वरून शून्य झाली. जनतेला केवळ विकासाची स्वप्नं दाखवून चालत नाही तर आलेल्या संधीचं सोनं करून दाखवावं लागतं. अन्यथा काय होतं हे नाशिकच्या निकालांनी दाखवून दिलंय.

उक्ती आणि कृतीत फरक

नेत्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक असेल तर जनतेनं तरी का विश्वास ठेवावा? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांत पुन्हा उत्साह आणण्यासाठी राज ठाकरेंनी मोठी सभा घेऊन स्वतः विधानसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं... आणि नंतर घूमजाव करून माघार घेतली. राज यांच्या अनेक आंदोलनातही अशीच विसंगती दिसली.

पक्षबांधणीकडे दुर्लक्ष

निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेतात, पण पाच वर्षांत पक्ष बांधणीकडे लक्ष दिलं नाही तर गर्दीच्या सभांचं मतांमध्ये रुपांतर होत नाही, याचा अनुभव या निवडणुकीनं पुन्हा त्यांना आला असेल.

मुद्यांचा अभाव

पक्षाकडे मुद्दे, आंदोलनं आणि संघटन नसेल तर निवडणुकीत केवळ चांगल्या भाषणाच्या आधारावर लोकं मतं देतील हा भ्रम या निवडणुकीत मतदारांनी दूर केला.

मनसेशिवाय विजय

मनसेकडून लढणाऱ्या सर्वच आमदारांना या निवडणुकीत जनतेनं घरी पाठवलं. मनसे सोडून भाजपकडून लढलेले राम कदम मात्र निवडून आले. मनसे सोडली तरी निवडून येऊ शकतो, हा संदेश राम कदम यांनी दिलाय. त्यामुळं शिवसेनेच्या बाबतीत जसं शिवसेना सोडली तो संपला किंवा त्याच्या पदरी कायमचा संघर्ष आला असा दरारा मनसेच्या बाबतीत निर्माण होऊ शकला नाही. निराश नेते आणि कार्यकर्ते कदाचित याच राम कदम मार्गानं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सगळ्यातून बाहेर पडणं मनसे अर्थात राज ठाकरेंसाठी मोठं आव्हान असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.