शिवसैनिकांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं होतं तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर 'मातोश्री'चा 'रिमोट कंट्रोल' चालायचा... पण आता 'मातोश्री'लाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायत... 

Updated: Oct 1, 2014, 09:16 PM IST
शिवसैनिकांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  title=

मुंबई : शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं होतं तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर 'मातोश्री'चा 'रिमोट कंट्रोल' चालायचा... पण आता 'मातोश्री'लाच मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायत... 

शिवसेनाप्रमुखांचा वारसदार
2002 मध्ये महाबळेश्वरच्या शिबिरात शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा झाली आणि तोच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण, यावरून ठाकरे कुटुंबात रण माजलं. राज ठाकरे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करुन स्वतःचा पक्ष काढला. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना सोडून, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर जहरी टीका करत, राज-राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाबाबत शंका घेतली जाऊ लागली. त्यांची ही पहिली अग्नीपरीक्षा होती...
 
उद्धव ठाकरेंचं 'बोर्डरूम पॉलिटिक्स'
गेल्या चार-पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व टप्प्याटप्प्यानं आकारास येऊ लागलंय. त्यांचं व्यूहचातुर्य त्यांचे विरोधकही मान्य करतात. आपल्या निवडक आणि विश्वासू सहका-यांच्या मदतीनं उद्धव यांनी राजकीय पटावरच्या सोंगट्या हुशारीनं हलवण्यास सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणं उद्धव ठाकरे हे मुलुखमैदान गाजवणारे फर्डे वक्ता नसतील, पण बोर्डरुम स्ट्रॅटिजीमध्ये त्यांचं कौशल्य सध्या महाराष्ट्र पाहतोय.. भाजपच्या नेत्यांना सध्या पावलापावलावर त्याचा अनुभव येतोय. शिवसेना कार्याध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या विश्वासातल्या दुस-या फळीतल्या नेत्यांना पुढे आणलं. त्यांच्यावर वेगवेगळ्या आणि मह्त्त्वाच्या जबाबदा-या सोपवल्या. गाव तिथे शाखा आणि प्रत्येक गावात भगवा अशी घोषणा देऊन शिवसेनेचा राज्यभर विस्तार व्हावा यासाठी त्यांनी मेहनत घेतली. भाजपच्या शत प्रतिशतला हा करारा जवाब होता...

उद्धव ठाकरेंची शिवसेना
नोव्हेंबर २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेनेचं आता काही खरं नाही असं म्हणणारे कैक होते. शिवसेनेत उभी फूट पडणार म्हणत दात विचकणारेही कमी नव्हते. या सगळ्या टीकाकारांना त्यांनी खोटं ठरवलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १९९७ पासून २०१२ पर्यंत मुंबई महापालिकेची प्रत्येक निवडणूक जिंकली. यंदा लोकसभेला तर १८ खासदार निवडून आणले. भाजपमध्ये मोदी-शहा असं नवं नेतृत्त्व उदयास आल्यानंतर उद्धव यांनीही आपल्या व्यूहरचनेत बदल केले. गेल्या काही वर्षांत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय... विशेषतः केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, उद्धव यांनी फार विचारपूर्वक शिवसेनेला आणि स्वतःला प्रोजेक्ट केलं. सौम्य-मितभाषी अशी उद्धव यांची ओळख आहे. मात्र योग्यवेळी ते आपली वाघनखं बाहेर काढतात हे त्यांच्या राजकीय शत्रूंना ठाऊक आहे.

ठाकरे घराण्यातला पहिला मुख्यमंत्री?
आगामी विधानसभा निवडणूक ही उद्धव ठाकरेंची ख-या अर्थानं सत्त्वपरीक्षा आहे. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलीय.. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसलीय. त्यासाठीच जागावाटपामध्ये ताठर भूमिका घेऊन त्यांनी भाजपची कोंडी केलीय.  उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदासाठीचा डाव मांडलाय... महाराष्ट्र विकासाची 'व्हिजन' घेऊन ते पुढं आलेत... शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक... आता ठाकरे घराण्यातला पहिला मुख्यमंत्री सत्तेवर येईल का, हे काळ ठरवेलच... पण तूर्तास तरी वटवृक्षाच्या छायेत मोठी झाडं उगवत नाहीत, ही म्हण त्यांनी खोटी ठरवलीय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.