ऑडिट विधानसभा मतदारसंघ - तुमसर, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ पूर्वी भाजपचा गड समजला जाई. मात्र 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अनिल बावनकर यांनी विजयी पताका फडकावली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.  

Updated: Oct 1, 2014, 04:59 PM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - तुमसर, भंडारा  title=

भंडारा : जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ पूर्वी भाजपचा गड समजला जाई. मात्र 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अनिल बावनकर यांनी विजयी पताका फडकावली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला हा भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ. या मतदार संघात मोहाडी आणि तुमसर या दोन्ही तालुक्यातील गावांचा समावेश आहे. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी भाजपच्या मधुकर कुकडे यांचा पराभव करत विजयश्री मिळवली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या अनिल बावनकर यांना ६८ हजार मते मिळाली. तर यापूर्वी तब्बल चार वेळा आमदार असलेल्या भाजपच्या मधुकर कुकडे यांना ५९ हजार मतांवर समाधान मानत पराभव पत्करावा लागला.  

आमदारांची विकासकामे...
मतदारसंघातील विकासकामांबाबत बोलायचं झालं तर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक विकासकामे केल्याचा दावा बावनकर यांनी केलाय. बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास, शेतीला वर्षभर पाणीपुरवठा, समाज भवन, समाज मंदिरांची उभारणी, रस्ते दुरूस्ती , नाल्यांचे काम पूर्ण आदी अनेक विकासकामे करत जनतेशी बांधिलकी जपल्याचा दावा बावनकर यांनी केलाय. 

या भागातील जनतेचा विकास हा उच्च शिक्षित आणि अभ्यासू उमेदवारच घडवू शकतो, असं सांगत भाजपच्या प्रदीप पडोले यांनी इथे भाजपकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. तुमसर मतदारसंघात नेते मंडळी कितीही आश्वासनं देत असली तरी अनेक समस्यांवर ठोस उपाय मात्र झालेले नाहीत. 

काय आहेत समस्या?
तुमसर रेल्वे स्टेशनवर उड्डाण पूल कधी होणार ?,  वाहतूक कोंडीचा  प्रश्न कायम आहे. , शेतक-याच्या शेतापर्यंत पाण्यासाठी उपाययोजना नाही., विद्यार्थ्यांना उच्च  शिक्षणाची सोय नाही., पिण्याच्या पाण्याची भटकंती कायम आहे. इथली जनता आशावादी असली तरी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनतरी जनतेला मिळालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

तुमसरमधील राजकारणही जाती-जातींभोवती फिरत असल्याने उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठी याबाबत काळजी घेताना दिसतात. यंदाच्या निवडणुकीला कोणते निकष लावले जातात, यावरही यशाची बरीच गणितं अवलंबून आहेत, असं विश्लेषकांना वाटतंय. 

राजकारणाबाबत सध्याची तरुणाई आता अधिक जागरूक झालेली आहे. त्यामुळे जातीची समीकरण जुळवणा-या राजकीय नेत्यांपेक्षा विकासाचे मुद्दे मांडणारा नेता या तरुणाईला हवा आहे. आणि नेमकी हीच गोष्ट सध्याच्या नेतेमंडळींनी वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.