अंकिता राणेला निवडणूक रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी

निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकारणातली ती कामाला लागली आहे. ठाण्यातील अंकिता राणेला रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी केली आहे.  

Updated: Jan 12, 2017, 04:38 PM IST
अंकिता राणेला निवडणूक रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी title=

ठाणे : निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकारणातली ती कामाला लागली आहे. ठाण्यातील अंकिता राणेला रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी केली आहे.  

शहरातील नौपाडा परिसर शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या परिसरात वास्तव्य करणाऱ्या अंकिताने तिच्या इमारती बाहेरील रस्त्यावर पाणीपुरीवाल्याला लोटय़ात लघुशंका करताना पाहिले. या किळसवाण्या प्रकाराचे चित्रिकरण करून पाणीपुरीवाल्याचे बिंग फोडले होते. झी मीडियाच्या माध्यमांतून ही चित्रफीत प्रसारित होताच राज्यभर खळबळ उडाली. त्याचा पुरेपूर फायदा उचलत मनसेने परप्रांतीयांविरोधातील आपल्या भूमिकेला पार्श्वभूमी निर्माण केली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अंकिताची भेट घेऊन तिच्या धाडसाचे कौतुक केले होते. दुसरीकडे, भाजपचे तत्कालीन मुंबई शहर अध्यक्ष राज पुरोहित यांनी अंकिताबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे या मुद्दय़ाने चांगलाच पेट घेतला होता. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणानंतर आता अंकिता राणे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. 

नौपाडय़ातील मनसेच्या विविध फलकांवर अंकिता राणेची छबी झळकू लागली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे नौपाडा परिसरातून अंकिताला उमेदवारी देईल, असे विश्वसनीय वृत्त आहे. 

शिवसेना आणि भाजप यांचा मतदारवर्ग मोठय़ा प्रमाणात असलेल्या नौपाडा परिसरात आपले आव्हान निर्माण करण्यासाठी मनसेने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. नौपाडा आणि पाचपाखाडी हा परिसर या शिवसेना व भाजप या पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून दोन्ही पक्षांची ताकद या परिसरांत मोठी आहे. अशा वेळी अंकिताच्या रूपात सर्वसामान्यांच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या तरुणीला आपल्या पक्षातून उमेदवारी देऊन नौपाडय़ात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

विधी शाखेची पदवीधर असलेल्या अंकिताला मनसेने नुकतेच उपाध्यक्षपद बहाल केले आहे. तरुण पिढीची राजकारणाला आवश्यकता असल्याने आपण मनसेचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे अंकिताने 'झी मीडिया'शी  बोलताना सांगितले. तर ज्यावेळी पाणीपुरी प्रकरण झाले होते तेव्हा मला सर्वच पक्षांनी मदत केली होती परंतु मनसे पक्षाने सर्वात जास्त मदत केली होती. हा पक्ष पूर्णपणे तिच्या मागे उभा होता. यामुळे जर समाजकारण करण्यासाठी राजकारणात उतरायचे असेल तर मनसे पक्षाबरोबरच जायायचे असे अंकिताने ठरवले.

तसेच राजकारणात राज ठाकरे यांचे व्हिजन अंकिताला आवडते यासाठी येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणुकीत मनसेकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे ती सांगते. तर या निर्णयाचे तिच्या घरातल्यांची ही स्वागत केले आहे. तर तरुणांनी तर खासकरून मुलींनी राजकारणात यावे, असा मोलाचा सल्ला अंकिताच्या वडिलांनी दिलाय. या प्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अंकिताला पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे, असे सांगितले.
     
खरंच राजकारण वाईट नसते तर तरुणांनी पुढे येऊन राजकारणाची ही छबी बदलावयाची गरज आहे त्यात खासकरून मुलींनी तर आवर्जुन राजकारणात उतरावे. आवड असेल तर राजकारणात येऊन मुलींनी समाजकारण करावे, असा मोलाचा सल्ला ही यावेळी अंकिताने मुलींना दिलाय.