दूधकोंडी! कमिशनच्या नादात ब्रॅण्डेड दुधावर बहिष्कार

दूध कंपन्या आणि वितरक यांच्यात कमिशनवरुन सुरु असलेल्या वादामुळं ठाणेकरांची बुधवारपासून दूधकोंडी होणार आहे..

Updated: May 19, 2015, 01:14 PM IST
दूधकोंडी! कमिशनच्या नादात ब्रॅण्डेड दुधावर बहिष्कार title=

ठाणे : दूध कंपन्या आणि वितरक यांच्यात कमिशनवरुन सुरु असलेल्या वादामुळं ठाणेकरांची बुधवारपासून दूधकोंडी होणार आहे..

ब्रॅण्डेड दूधाच्या विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वितरकांनी घेतलाय. ठाणे शहर दूध विक्रेता कल्याणकारी संघाने हा निर्णय घेतलाय.

महानंद वगळून अमूल, गोकूळ, वारणा व मदर डेअरी या अन्य कंपन्यांचे दूध विक्री थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

दूध कंपन्या वितरकांना अत्यल्प कमिशन देत असल्याने विक्रेत्यांना एमआरपीवर एक ते दोन रुपये अधिकचे शुल्क आकारावे लागत होते. अधिकच्या शुल्काविरोधात ग्राहक संघटनांनी आवाज उठवल्याने वैधमापन शास्त्र विभागाने एमआरपीपेक्षा जास्त दराने दूध विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली होती. कारवाईचा बडगा उगारल्याने गोंधळलेल्या विक्रेत्यांनी दूध कंपन्यांकडे जास्तीच्या कमिशनची मागणी सुरू केली होती.

याच मागणीसाठी विक्रेत्यांनी ब्रॅण्डेड दूध कंपन्यांच्या दूध विक्रीवर एप्रिल महिन्यात बहिष्कार टाकला होता.. त्यावेळी 15 दिवसांत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. 

दुग्धविकास मंत्र्यांची बैठक

दरम्यान, दूध दरावरून उद्भवलेल्या संपस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी बैठक बोलावली आहे. राज्यात दूध दर कमी झाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण  झाल्या आहेत,  तसेच अनेक ठिकाणी काही दूध वितरण व्यवस्था अडचणीत सापडल्या आहेत. तर सतत मागणी करूनही दूध उत्पादक आणि वितरकांमध्ये कमिशनचा वाद कायम आहे. त्यामुळे खडसेंनी बोलावलेली बैठक ही दूध उत्पादक आणि वितरकांच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.