मराठवाड्याचा शेतकरी नक्षलवादाकडे वळतोय; भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'

मराठवाड्यातला पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. भाजपच्या एका आमदारानंच मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र पाठवून, स्वपक्षीय सरकारवरच लेटर बॉम्ब फोडलाय. 

Updated: Oct 16, 2015, 09:45 PM IST
मराठवाड्याचा शेतकरी नक्षलवादाकडे वळतोय; भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब' title=

मुंबई / औरंगाबाद : मराठवाड्यातला पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. भाजपच्या एका आमदारानंच मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र पाठवून, स्वपक्षीय सरकारवरच लेटर बॉम्ब फोडलाय. 

तहानलेल्या मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींच्या भावनाही आता पेट घेऊ लागल्यात. 'मराठवाड्याच्या वरच्या भागात बांधलेली 48 टीएमसी पाणीसाठ्याची बेकायदा धरणं बॉम्बनं उडवून द्या...' ही मागणी केलीय ती भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आमदार बंब यांनी सरकारला हा घरचा आहेर दिलाय. 

राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे बंब चांगलेच संतापलेत. मराठवाड्यातले शेतकरी नक्षलवादी होण्याकडं वाटचाल करत आहेत, याकडंही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. 

दरम्यान, बंब यांच्या भावना उचित असल्या तरी बॉम्बनं धरणं उडवण्याचं वक्तव्य चुकीचं आहे, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी व्यक्त केलंय.

आधीच पावसानं पाठ फिरवल्यानं दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा घसा कोरडा पडलाय. त्यात जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात बांधलेल्या धरणांमुळे मराठवाड्याच्या हक्काचं पाणीही मिळेनासं झालं... मराठवाड्याचं हे गाऱ्हाणं मायबाप सरकारला कधी ऐकू जाणार...?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.