आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 

Updated: Dec 7, 2016, 02:15 PM IST
आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड title=

प्रशांत शर्मा, शिर्डी : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 

पुरोगामित्वाचं बिरूद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचे चटके बसत आहेत. संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथील नंदीवाले म्हणजेच तिरमली जातीच्या माणीक हाटकर या तरूणाने पाच वर्षापूर्वी जंगम समाजातील मुलीशी विवाह केला होता. याच कारणाहून समाजाच्या पंचानी हाटकर कुटुंबाला गेल्या पाच वर्षांपासून वाळीत टाकलंय. विशेष म्हणजे, या कुटुंबाला मदत करणाऱ्या इतर दहा कुटुंबानांही बहिष्कृत करण्यात आलंय. गंभीर बाब म्हणजे जातीत परत यायचं असेल तर तब्बल २७ लाखांचा दंडही ठोठावला आहे.

बहिष्कृताचं जीवन जगत हे कुटंब कसंबसं राहतंय. मात्र जातपंचायतीचा जाच यांच्यासाठी रोजचाच झालाय. समाजाच्या कोणाच्याही घरी यांना सुख दुःखाला बोलावलं जात नाही. त्यांच्याकडेही कोणी येत नाही. एवढ्यावरच न थांबता पंचानी गेल्या पाच वर्षांपासून दंडाच्या २७ लाखांसाठी तगादा लावलाय. जर पैसे दिले नाही तर धमकावंलही जातंय.

अखेर या कुटुंबानं संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली. तिरमली समाजातील दहा पंचाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दहा जणांविरोधात सामूहिक छळ आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. आरोपींपैकी गंगाराम मले आणी रामा फुलमाळी या दोघांना ताब्यात घेतलं गेलंय.  

जात पंचायतीची कीड कायस्वरुपी नष्ट करण्यासाठी कडक कायदे होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या प्रश्नी विविध पातळ्यांवर जनजागृती होणंही तितकेच महत्वाचं आहे.