अपघातामुळं एकत्र आले ४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले भाऊ!

४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले दोघे भाऊ... अपघातानं एकत्र येतात... ही झाली फिल्मी कहाणी... पण उस्मानाबादमध्ये ही कहाणी चक्क प्रत्यक्षात साकारलीय. मानवी आयुष्यातील विचित्र योगायोगांचा साक्षात्कार घडवणारी, दोघा भावांची ही भरतभेट कशी झालीय.

Updated: Jan 17, 2015, 10:52 PM IST
अपघातामुळं एकत्र आले ४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले भाऊ! title=

उस्मानाबाद: ४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले दोघे भाऊ... अपघातानं एकत्र येतात... ही झाली फिल्मी कहाणी... पण उस्मानाबादमध्ये ही कहाणी चक्क प्रत्यक्षात साकारलीय. मानवी आयुष्यातील विचित्र योगायोगांचा साक्षात्कार घडवणारी, दोघा भावांची ही भरतभेट कशी झालीय.

 
उस्मानाबाद जिल्ह्यात औरंगाबाद महामार्गावर चोराखळी गावाजवळ ९ जानेवारीला झालेल्या बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ४ जण ठार आणि २१ जण जखमी झाले. जखमींना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या जखमींपैकी एक नाव होतं, ५० वर्षीय भगवान गोविंद नाईकवाडी यांचं...

त्यांच्यासाठी हा अपघात इष्टापत्तीच ठरला... कारण या अपघाताची बातमी प्रसिद्ध झाली, त्यात जखमींच्या यादीत भगवान नाईकवाडी यांचं नाव होतं आणि त्यामुळंच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.. ४५ वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या ‘भगवान’ला शोधत त्यांचा भाऊ ‘जगन्नाथ’ जिल्हा रुग्णालयात पोहचला.

“पेपरमध्ये अपघाताची बातमी वाचली, जखमीमध्ये भगवान गोविंद नाईकवाडी असं भावाच्या नावाशी साधर्म्य असलेलं नाव वाचलं..आणि आपला भाऊ असू शकतो या विचारानं, शोधात जिल्हा रुग्णालयात आलो...आणि...विचारपूस केली आणि खात्री पटली..भाऊ सापडला, असं जगन्नाथ सांगतात.

बालपणी दुरावलेल्या दोघा भावांची अशी 'भरतभेट' झाली. अकलूजजवळील माळीनगर त्यांचं गाव. वयाच्या पाचव्या वर्षीच आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर पाच भावांपैकी लहानग्या तिघांना नातेवाईकांनी अनाथालयात भरती केलं. मात्र काही दिवसातच या ३ भावंडानी रिमांड होममधून पळ काढला. तेव्हा त्यांची ताटातूट झाली, ती आतापर्यंत...

“ बोर्डिंग मधून पळून गेलो, उल्हासनगर , मुंबईमध्ये बंगाली माणसाकडे चष्मा दुकानात काम केलं. तेथून उस्मानाबादमध्ये आलो, बस स्टँडस्थानावर सायकल रिक्षा चालवली १८ ते २० वर्ष, एका लोखंडी सळइच्या दुकानात हमालीचं काम केलं आणि आता २ वर्षांपूर्वी एका दुकानात काम करून त्याच्या घरी राहतो.”

पुण्यात मोलमजुरी करून आयुष्य जगणारे जगन्नाथ नाईकवडी गेल्या ४५ वर्षांपासून आपल्या भावंडांचा शोध घेत होते... त्यांचा एक भाऊ, असा अपघातानं सापडला... आता उरलेले आणखी दोघे भाऊही आयुष्याच्या एखाद्या वळणावर असेच सापडतील, अशी त्यांना आशा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.