आजपासून तीन दिवस मेडिकल राहणार बंद!

राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. औषध विक्रेते १८ डिसेंबरला नागपूरला मोर्चाही काढणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2013, 10:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. औषध विक्रेते १८ डिसेंबरला नागपूरला मोर्चाही काढणार आहेत.
जनतेच्या आरोग्य रक्षणाचा मुद्दा पुढे करत अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईचा धडाका सुरु केलाय. याचा निषेध म्हणून औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलाय. ‘एफडीए’च्या औषध दुकानांवरील छापा अवैध आहेत... ते थांबवावेत... काहीही कारणांवरुन परवाना निलंबित करण्याचा प्रकार थांबवावा... औषध विक्रेत्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी... अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत.
विविध कारणांनी तीन ते साडेतीन हजार औषध विक्रेत्यांची रद्द झालेली लायसन्स परत मिळावीत... औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापून त्यावर निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या आदेशावर अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही. या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी, अशीही मागणी औषध विक्रेत्यांनी केलीय.
दरम्यान, जिल्ह्यातील औषध दुकानं बंद ठेऊ नये, अन्यथा औषध मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी सूचना सांगलीच्या अन्न औषध प्रशासन विभागानं दिलीय. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात जनसंपर्कासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आलाय. बंद दरम्यान लोकांना काही तक्रारी असल्यास ०२३३ - २६७२२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन अन्न-औषध प्रशासनानं केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.