मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

Updated: Sep 17, 2014, 06:11 PM IST
मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी? title=

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं नेतृत्व करणा-या मुख्यमंत्र्यांना निवडणूक कुठुन लढवायची हा सवाल भेडसावतोय. त्यांची नजर आहे ती दक्षिण कराड मतदारसंघावर. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी इथं विकास कामांचा धडाका लावलाय. दर शनिवार-रविवारी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम दक्षिण कराडमध्ये असायचा. त्यामुळे त्यांना दक्षिण कराडमधून निवडणूक लढवायची आहे हे स्पष्ट झालयं. मात्र इथून निवडणूक लढवणं मुख्यमंत्र्यांसाठी तेवढं सोपं नाही. 

काँग्रेसचे आमदार विलासकाका उंडाळकर यांनी इथून निवडणूक लढववण्याचे जाहीर केलयं. मागील सात वेळा ते इथून आमदार म्हणून निवडून आलेत. तर दक्षिण कराडमधून विलासकाका उंडाळकरांना प्रथम उमेदवारी दिली ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री प्रमिलाकाकू यांनी. पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांच्या निवडणुकीत पोलिंग एजंट म्हणूनही काम केलयं. मात्र उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध मागील काही वर्षात बिघडले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांना आपल्या मंत्रिमंडळातही स्थान दिलेले नाही.

उंडाळकरांबरोबरच काँग्रेसचे अतुल भोसले यांनीही इथून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलयं. ते बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. राष्ट्रवादीकडूनही इथून मुख्यमंत्र्यांची अडचण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं बोललं जातंय. त्यामुळेच मुख्यमंत्री अजूनही कुठून निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलेलं नाही.

दक्षिण कराडमधून दगाफटका होऊ शकतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी माण अथवा वाईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह काँग्रेसच्या काही स्थानिक लोकांकडून होतोय. पण ते मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ कोणता हे अद्याप निश्चित होत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.