काँग्रेस-भाजप वाद, डोक्यात खुर्च्या घालण्याचा प्रयत्न

सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले.

Updated: Nov 23, 2016, 07:02 PM IST
काँग्रेस-भाजप वाद, डोक्यात खुर्च्या घालण्याचा प्रयत्न  title=

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले.

एवढंच नव्हे तर थेट खुर्च्याच एकमेकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. यामुळं बैठकीत मोठा गोंधळ उडाला. भाजप आणि काँग्रेसचे सदस्य एकमेकांच्या मागे धावू लागले. गल्लीतल्या भांडणालाही लाजवेल असा प्रकार या बैठकीत पाहायला मिळाला.

या सभेत निलंबित वाहक जितेंद्र मोरे यास कामावर घेण्यावरून गोंधळ सुरु झाला. काँग्रेसचे शिवाजी मग्रुमखाने आणि भाजपचे अनंत धुम्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळं गोंधळात भर पडली.

मात्र संतप्त झालेल्या काँग्रेसच्य़ा मग्रुमखाने यांनी खुर्चीच घालीन म्हणत खुर्ची उचलण्याच्या पवित्रा घेतला. त्यावर भाजपच्या बंडगर यांनी कडी केली आणि थेट खुर्चीच उचलली. यामुळं या बैठकीला आखाड्याचं स्वरूप आलं.

पालिकेच्या परिवहन विभागाच्या 90 बसेस खराब झाल्यानं जागीच उभ्या आहेत. रोजचा पालिकेला लाखो रुपयांचा फटका बसतोय आणि जनतेचीही गैरसोय होतेय. मात्र त्यावर तोडगा काढण्याऐवजी लोकप्रतिनिधी पालिकेची शोभा करतायत.