'जितेंद्र आव्हाडांची नौटंकी'

दहीहंडीसारख्या सणांवर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड कोर्टात आव्हान देणार आहेत. तर दुसरीकडे आव्हाडांची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

Updated: Sep 1, 2015, 07:56 PM IST
'जितेंद्र आव्हाडांची नौटंकी' title=

कपिल राऊत, ठाणे : दहीहंडीसारख्या सणांवर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड कोर्टात आव्हान देणार आहेत. तर दुसरीकडे आव्हाडांची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

यंदा कितव्या थरावर दहीहंडी फुटणार, हे सांगणं अवघड झालंय. मात्र राजकीय वादांचे थरावर थर आतापासूनच चढू लागलेत. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यासारख्या सणांवर यंदा हायकोर्टानं, सरकारनं आणि पोलिसांनी निर्बंध घातल्यानं उत्सवप्रेमी नाराज झालेत. याविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा इशारा राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलाय. यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी टीकेच्या फैरी झाडल्यात.

यानिमित्तानं उत्सव मंडळांना कसं वेठीस धरलं जातंय, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. हायकोर्टाच्या आदेशांचं निमित्त करून पोलीस उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करत आहेत. ध्वनी प्रदुषणाच्या नावानं स्पीकर्सचा व्यवसाय करणा-यांवर गदा आणली जातेय. दहीहंडी किती उंच असावी? गणेशोत्सवाचे मंडप किती उंच असावेत?, स्पीकर्सचा आवाज किती डेसीबल असावा? याबाबत मुंबईला विशेष सूट देण्यात आलीय. मग ठाणे शहरावरच पोलिसांकडून अन्याय का? असा सवाल आव्हाड यांनी केलाय.

जितेंद्र आव्हाड यांनी दुष्काळामुळे दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचे म्हटले होते. हहीहंडीची रक्कम दुष्काळग्रस्त भागात दिली असे म्हटले होते. दरम्यान, ही सगळी जितेंद्र आव्हाडांची नौटंकी असल्याचा टोला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लगावलाय. आव्हाड आणि सरनाईक यांच्यातली वादावादी नवी नाही. मात्र संस्कृती रक्षणाच्या नावाखाली वैयक्तिक हेव्यादाव्यांना खतपाणी घातलं जातंय का, अशी चर्चा सुरु झालेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.