जलयुक्त शिवाराचे सकारात्मक बदल...

जलयुक्त शिवार अभियानाचे सकारात्मक परिणाम खान्देशात अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. विशेष करून लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा परिणाम अधिक उठून दिसणारा आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची काम पूर्ण झाली आहेत अश्या बहुतांश गावात रब्बी हंगामात पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 3, 2017, 09:52 PM IST
जलयुक्त शिवाराचे सकारात्मक बदल... title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : जलयुक्त शिवार अभियानाचे सकारात्मक परिणाम खान्देशात अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. विशेष करून लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा परिणाम अधिक उठून दिसणारा आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची काम पूर्ण झाली आहेत अश्या बहुतांश गावात रब्बी हंगामात पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. 

खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात चारशेहून अधिक गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलसंधारणाची काम झाली आहेत. या कामाचे दृश्य परिणाम आता त्या त्या गावात दिसू लागले आहेत. या जलसंधारणाच्या कामांमुळे पिण्याचा, शेतीच्या आणि जनावरांना लागणाऱ्या पाण्याच्या प्रश्न मार्गी निघाला आहे. विशेष म्हणजे एकट्या धुळे जिल्ह्यात रब्बी लागवड क्षेत्र जलयुक्त शिवार अभियानाची काम झालेल्या गावांमध्ये चार हजार हेक्टरने वाढले आहे. इतकंच नव्हे तर या गावांचा पीक लागवड प्राधान्यक्रमही बदललाय. फळबागेकडे येथील शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे. जिल्ह्यातील १२९ गावांमध्ये रब्बीचे लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवरून १९ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. 

अनेक तालुक्यांमध्ये जलपातळीत वाढ नोंदवली गेली आहे. जलसंधारणाच्या  कामात जनतेनेही भरभरून लोकसहभाग नोंदवला आहे. धुळे जिल्ह्यात ३७ लाख घनमीटर गाळ काढला गेलाय. हा गाळ तीन हजार सातशे हेक्टर जमिनीवर टाकून जमीन सुपीक करण्यात आली आहे.  

 जलयुक्त शिवार अभियानाचे दृश्य परिणाम दिसत असल्याने हे अभियान जनतेला आश्वासक जलसमृद्धीचा मार्ग वाटत आहे. त्यामुळे राजेंद्र सिंग यांच्यासारख्या जलतज्ज्ञाने दिलेला गंभीर इशारा सरकारने गाभीर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा सिंग सांगतात त्याप्रमाणे हे अभियान ठेकेदारांच्या पोटल्या भरणारे ठरेल आणि जनतेचा पुन्हा सरकार योजनावरून विश्वास उडेल.